मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
मुलगी आमची युरोपात असते आ...

सुनील गोडसे - मुलगी आमची युरोपात असते आ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


मुलगी आमची युरोपात असते
आणि मुलगा यूएसमध्ये असतो
इथं मात्र आम्ही दोघंच असतो
जावई मुलासारखा वागतो
सुनेतही मुलीचाच भास होतो
‘इकडे या, इकडेच या’
दोघांचाही आग्रहच असतो
इथं मात्र आम्ही दोघंच असतो !
हिचं महिला मंडळ आहे
दुपारचा वेळ तिचा तिकडे जातो
मला कसलीच आवड नाही
मी एकटाच घरी बसतो
कारण आम्ही दोघंच असतो !
संध्याकाळी ती सिरिअल बघते
आणि मी फिरायला जातो
बिल्डिंगमागे सूर्य डुबतो
मग मी आपसूक घरी येतो
कारण आम्ही दोघंच असतो !
एकदा मुलाचा फोन येतो
एकदा मुलीचा फोन येतो
काळजीनं चौकशी करतात
आमचाही ऊर भरुन येतो
कारण आम्ही दोघचं असतो !
नव्या नवलाईनं जाऊनही आलो
स्वच्छ सुंदर सगळं पाहूनही आलो
पण ते सगळं मात्र तेवढंच
काही म्हणा, तिकडं जीव गुदमरतो
कारण आम्ही दोघंच असतो!
नाही तक्रार नाही कसलीच इथं
आणि नाही कसली तक्रार तिथं
नाही कसली अडचण सुखाची
पण इथली सगळी वर्षं आठवतो
कारण आम्ही दोघंच असतो !
भांडण-तंटे आमचे खूप होतात
नसतं तिला स्मरण नि मला आठवण
खरं तर काहीच नसतं वादाचं कारण
मग आम्हीच आम्हाला समजावतो
कारण आम्ही दोघंच असतो !
खरोखर तिला कवठी चाफा आवडतो
तो एकाच फुलवाल्याकडे मिळतो
नेहमीच तो मिळतो असं नाही
पण तो आला, की मी नक्की आणतो
कारण आम्ही दोघंच असतो !
हल्ली कधी कधी ती भावुक होते
तुमच्याआधी मला जायचंय म्हणते
मग मी म्हणतो-माझं कसं होणार?
म्हणते कशी-तुम्ही असेच स्वार्थी !
मी जाणार त्याचं काहीच नाही
काळजी काय, तर माझं कसं होणार?
लुटुपुटुचं असतं हे तिचं नि माझं
यावर तीही मग हसतं नि मीही हसतो
कारण आम्ही दोघंच असतो !
कारण आम्ही दोघंच असतो !!

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP