इंद्रजित उगले - जवळ माझ्या कुणी टिकत नाही...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जवळ माझ्या कुणी टिकत नाही
मी कुणालाच परवडत नाही
कान देऊन ऐक तू माझे
सहज काहीच मी म्हणत नाही
बाग नुसतीच ही बहरलेली...
एक झोका कुठे दिसत नाही
फ़क्त त्याचा विचार केल्याने
जे हवे ते कधी मिळत नाही
ही अवस्था किती बरी आहे...
मन कशातच अता रमत नाही
दिवसभर एक काम नसते पण
दिवस जातो कसा कळत नाही
काय होईल मग पुढे माझे...?
आज काहीच मी करत नाही
काय लक्षात ठेवले होते ?
नेमके काय आठवत नाही ? ?
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP