पूर्वी - या पृथ्वीच्या रंगपटावर रो...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
या पृथ्वीच्या रंगपटावर
रोज नव्याने शर्यत रंगे
अशक्त धडपड पाहुन हसती
शतसूर्यांची प्रकाशटिंबे
स्वत: स्वत:वर लादून ओझी
किती गाढवे शर्यत पळती
कोलाहलात धावत धावत
म्हणे शोधती सदैव शांती
कणखर चेहर्यावरी उमटती
थकल्या स्वगताची प्रतिबिंबे
अव्यक्त बडबड पाहुनी हसती
शतसूर्यांची प्रकाशटिंबे
पळणार्यांच्या झोळीमध्ये
जरी सदा खुलखुळती नाणी
पोट रिकामे सतत पिपासा
अशी अवस्था केविलवाणी
भ्रांत हरवुनी झोप उडे मग
आणि वेदना छातीत तुंबे
संतत धडधड पाहुनी हसती
शतसूर्यांची प्रकाशटिंबे
पैज जिंकुनी खिशात पडता
पदव्या इमले विभ्रम सारे
पुन्हा नव्याने पाठीवरती
आकांक्षांचे नित डोलारे
शेवट इतका जवळ दिसे पण
फ़सवुनी स्पर्धा क्षणात लांबे
अविरत पडझड पाहून हसती
शतसूर्यांची प्रकाशटिंबे
शर्यत ती ही अशी निरंतर
अंतिम रेषा ज्याला नाही
अखंड तडफ़ड पाहुन हसती
शतसूर्यांची प्रकाशटिंबे
Last Updated : November 11, 2016
TOP