कल्पना मलये - चालतेच आहे ती सालोसाल डोक...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
चालतेच आहे ती सालोसाल
डोक्यावर ओझं
आणि रणरणतं ऊन्ह घेऊन
झेलतेय वैशाखवणवा
आणि श्रावणधारा
दोन्ही तितक्याच तटस्थतेनं
आणि हिमतीनं
संसाराचा गाडा हाकताना
होतेय तिची ससेहोलपट
आणि तारेवरची कसरतही
पण तमा नाहीय तिला
उन्हात काळवंडणार्या कातडीची
आणि ठेचाळल्यावर पायांतून येणार्या रक्ताचीही
घरोघरचे जुने कपडे घेऊन
त्याबदल्यात नवी भांडी देताना
तिला दिसत राहतो त्या भांड्यांच्या
गोल तळाशी...भाकरीचा चंद्र
घरातल्या चिल्यापिल्यांच्या मुखी भरवण्यासाठी
जुन्या - नव्याच्या या देण्या - घेण्यात, अदलाबदलीत
अनेकदा तिला वाटूनही जात असेल कदाचित
कदाचित...
की आपलंही हे वणवणतं, भटकतं आयुष्य
एके दिवशी
असंच बदलून मिळालं तर !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP