घनश्याम धेंडे - भक्त, भागवत, वारकर्यांति...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
भक्त, भागवत, वारकर्यांतिल तूच नाळ व्हावे
विठोमाउली. तव कुशीत मी पुन्हा बाळ व्हावे !
तव पायाशी वीटही होणे नसेल नशिबी जर का
मृदंग, वीणा, अबीर, चिपळ्या, झांज, टाळ व्हावे
लेखणीत उतरावी प्रतिभा ज्ञानदेव, तुकयाची...
कविता, गाणे अभंगापरी बहुरसाळ व्हावे
आषाढी - कार्तिकीस जाता पावि पालखीसंगे...
मीपण माझे सोहळ्यामधे त्या गहाळ व्हावे !
आत्म्यावरले वसन भर्जरी गळुन पडावे बाप्पा !
गळ्यात तुझिया भावभक्तिची तुळशिमाळ व्हावे
वारकर्यांसह नाचू दोघे वाळवंटि भिवरेच्या
तप्त वाळुच्या नुपुरांचे मम पदी चाळ व्हावे
वावरात मी राबावे, तव अभंग - ओव्या गाता
कृषीवलाच्या नांगरासही मीच फाळ व्हावे
तुझ्या कृप्तेने सरून जावो अंधकार अंतरीचा
होनाजीच्या भूपाळीतिल मी सकाळ व्हावे
महापुरे झाडेही जाती, ज्ञात विठ्ठला, मजला
कवितारूपे उरावयाला मी लव्हाळ व्हावे
पंख छाटले तरी वाटते घ्यावी उंच भरारी
इवल्याशा घरट्याचे माझ्या अंतराळ व्हावे
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP