डॉ. सुनील लोंढे - शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भरलेले माणसांचे बाजार...
सुरकुतलेल्या चेहर्यांवर आशेचा किरण...
पिशवीत दशम्यांचं गाठोडं...
एका दिवसासाठी विकले जाणारे माणसांचे हे ढीग
का ते समजत नाही; पण या रस्त्यावरून जाताना
मनात उठतो कमालीचा गोंधळ
काहूर सुरू होतं विचारांचं...
विसरली जातात स्वत:ची सगळी सुखं
आशेनं पाहणारे अनेक डोळे
केविलवाण्या नजरेनं पाहणारे...
मला सवय आहे चेहरे वाचण्याची !
खूप चेहरे वाचले आजवर...
पण हे मजुरांचे चेहरे ?
मी अजूनही वाचतोच आहे ते...
त्यांची न संपणार्या दु:खाची लिपी...
राहिलेली पानं वाचताना
येत चालली आहे मला अनामिक अस्वस्थता...
कारण,
अखेरचं पान वाचत असताना
कुणीतरी वाचत असेल माझाही चेहरा...
कदाचित !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP