शंकर विटणकर - सोबत चाले चंद्र नभीचा.......
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
सोबत चाले चंद्र नभीचा....मी न एकटा
मार्ग दाखवी दिवा मनाचा....मी न एकटा !
हितगुज करती पक्षी जेव्हा फुलाफुलांशी
असतो मीही सखा तयांचा....मी न एकटा !
चुकताही सावरता येते हजार वेळा
अनुभव सांगे आयुष्याचा....मी न एकटा !
कष्टाला पर्याय न जीवन सार्थ करावा
शिकवी मज दिनक्रम सूर्याचा....मी न एकटा !
तहान शमवी सर्व जगाची स्वतःस अर्पून
थोर पुढे आदर्श जगाचा....मी न एकटा !
मनात दुर्दम इच्छा शक्ती जिंकायाची
समोर पर्वत असो व्यर्थाचा....मी न एकटा !
सुजलाम् सुफलाम् होईल माझा देश जयांनी
ध्यास अंतरी त्या स्वप्नांचा....मी न एकटा !
घेऊन आला तुझी आठवण सायंतारा
साद घालण्या छंद गझलचा....मी न एकटा !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP