अजय कांडर - हा कसला कचरा साठलाय मेंदू...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
हा कसला कचरा साठलाय मेंदूत
कळत नाहीय, कळत नाहीय
डंपिंग ग्राऊंड होऊ पाहतोय तो
त्याला आता
कोणतीच जवळ करावीशी वाटत नाही विचारधारा
आता आपण आपल्या ताब्यातून सुटण्याआधीच
मला माझा मेंदू परत करायचाय !
जन्मापासून फ़ारच चुकीच्या आयडियालॉजित अडकत
गेलो
आईने सांगितली नाही कधी श्यामच्या आईची गोष्ट
पण ती बजावत राहायची नेहमी
परोपकारी राहावे माणसाने, माणसावर प्रेम करावे
त्याची जात, धर्म विसरून
पण आईचे हे उद्गार अमलात आणून जगताच आले
नाही कधीही
पण मी तसे जगू पाहताना
कोण माझा मेंदू ताब्यात घेत होता
निधर्मवादाचे शब्द उच्चारत
आणि पुरोगामित्वाचे सोंग घेत
की मीच मला फ़सवत गेलो आजवर
धर्म परंपरेची जळमटं
दिवसेंदिवस साफ़ करून टाकतानाही
ती कुठेतरी अडकून बसलीच असावी आपल्याही मेंदूत
असे उगाच वाटत राहतं अधूनमधून
तरीही बुद्ध, कबीर, शाहू, फ़ुले, आंबेडकरांना शरण जात
राहिलो
कोण म्हणतंय, मला बुद्ध कळत नाही
कोण म्हणतंय, मला कबीर कळत नाही
पण त्यांना माहीत नाही
मी या महापुरुषांची नावे घेत
उत्सवी होत जाताना मी त्यांना दैवत्व बहाल केले
मग त्यांच्या विचारांपेक्षा
त्यांची प्रतिमाच जवळची वाटू लागली
आणि मग मी माझ्या अस्मितेचाच
आवाज मोठा करत राहिलो
पण लक्षातच आले नाही माझ्या
धर्मांध दहसह्तीला सुरंग लावण्याचा माझा उच्चार
यातच कधी विरून गेला ते
मी असा माझ्यातच मश्गुल होत जाताना
बघता बघता त्यांनींही माझा मेंदू घेतला ताब्यात
तसा तो त्यांना आधीपासूनच हवा होता
पण त्यासाठी त्यांनी कोणतीच व्यूहरचना रचली नाही
फ़क्त मला माझा आवाज मोठा करून देतानाच
मला माझ्या समान धर्मियंबरोबर झुंजत ठेवले
मग आम्ही असे भांडत राहिलो
की आमचा कोणताच आवाज एकमेकांना ऐकू येईनासा
झाला
मग ते अधिकच सवध झाले
ते आधी धर्मांचे पालन करा अशी विनंती करायचे
पण आमचा आवाज एकमेकांना ऐकू येईनासा झाला
असए लक्षात आल्यावर त्यांनी तर
स्पष्ट धर्मादेश द्यायला प्रारंभ केला
पण ते एवढे हुशार की
त्याच्या आधीच त्यांनी
आमच्या भूसांस्कृतिक परंपरेला धर्मवादी बनवले
त्याचा आधार घेत मग ते धर्माचे रक्षक झाले
धर्म रक्षक होताच
ते दैवत्व प्राप्त झाल्यासारखे वागू लागले
मग धर्मादेश देत ते
निधर्मीवाद्यांना दहशतवादी ठरवू लागले
पुरोगामी हा शब्द तर ते शिव्या म्हणूनच उच्चारतायत
त्यांना विचाराची भीती एवढी वाटतेय की
त्यांने बेधडक खून सत्र सुरू केलंय
मात्र आम्ही भयभीत नक्कीच झालो नाही
आम्हाला मरणाचं भय नाहीच
पण माणसाला माणसासारखं जगू देत नाही
आणि तेही तसे जगत नाहीत
याचीच घृना वाटत राहते मनात
त्यांना आता फ़क्त
आपल्या परंपरेत राहणारा इतरांचा मेंदूच हवाय
म्हणूनच आम्ही
त्यांच्या रंगाचा निषेध नोंदवताना
चुकून त्यांच्या दूरच्या सहवासातून
आमच्याही मेंदूवर चढला गेला असेल धर्मांचा थर
या कल्पनेनेच
मी आता माझा मेंदूच परत करतोय !
मी आता शोधात आहे
एका नव्या मेंदूच्या
ज्याच्यातून जात, धर्म, देव
अशा कोणत्याच संकल्पनेचा पाझर नाही फ़ुटणार कधीही !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP