राजेंद्र मोरे - मी पाहिली आहे नदी... शहरा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मी पाहिली आहे नदी...
शहराच्या मधोमध वाहणारी
किनार्याला कुठंतरी झाडं
पण...गगनचुंबी इमारतींनी वेढलेली
मी पाहिली आहे नदी...
काठाकाठानं फिरत
तोंडाला मास्क लावून
कचर्याचे ढिगारे तुडवत
क्रिकेट खेळताना
मी पाहिली आहे नदी...
मल-मुत्राचे नाले सोबत घेऊन
स्वतःला जलपर्णीच्या खाली गाडून घेणारी
कुठंतरी उतारावरून खळखळ करत
पांढर्या विषारी फेसातून
दुर्गंधीचे फवारे उडवत वाहणारी
मी पाहिली आहे नदी...
जीव गुदमरून तडफडणारे मासे
अलगद किनार्याला सोडणारी
ते धूर्त बगळ्यांच्या स्वाधीन करणारी
कुणालाच न सांगता दुःख गिळणारी
मी पाहिली आहे नदी...
पाणी असून पाणी नसलेली
नदी असून नदी नसलेली
सगळ्यांच्या तोंडी चेष्टेचा विषय झालेली
जिच्या उल्लेखानं नाकं मुरडली जातात
तिरस्कारानं
अशी
मी पाहिली आहे एक नदी...
N/A
References : N/A
Last Updated : March 04, 2018
TOP