मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
किती नाजूक, किती कोमल कित...

सारिका मोरे - किती नाजूक, किती कोमल कित...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


किती नाजूक, किती कोमल
किती कोवळं, किती हळवं
वसंत फुलताना पहिल्यांदाच पाहिलं त्याला
नुसत्या स्पर्शानंही कोमेजून जाण्याची भीती
उंच झाडाच्या कणखर फांदीवर
दिमाखात डुलणारं ते इवलंस पान
फुलांमध्ये खेळत, वार्‍यावर झुलत
हळुहळू तारूण्यानं बहरत गेलं
किती सुंदर हिरवी छटा लेऊन
निसर्गाचं प्रतिक बनलं
प्रेमी युगुलांना लाजवत
ऋतूगणिक बहरत जाऊन
कविमनाचं ते आधार ठरलं
तारुण्यानं फुलून- बहरुन गेलेलं ते पान
हळूहळू परिपक्व झालं
पौढत्वात आलं
कधी ते तापलेल्या चिमुकल्या जिवाला
सावली देऊ लागलं
कधी घरटं नसलेल्या पाखराला
छत देऊ लागलं
कधी ते प्राणिमात्रांची ‘भाकर’ बनलं
त्याचं अस्तित्व असं
जीवसृष्टीच्या जगण्याचं रहस्य ठरलं
आता त्या पानात उतारवयाच्या
पिवळ्या रंगाच्या छटा दिसू लागल्या
कारण,
येणार्‍या वसंतात त्याच्या जागेवर
नवीन कोवळं पान स्थिरावणार होतं....
आता त्या पिवळ्यां, जीर्णशीर्ण पानाचा
शेवट जवळ आला.....
कधीकाळी झाडाच्या शेंडयाशी फुललेलं ते पान
पायदळी तुडवलं जाण्यासाठी
अखेर झाडाच्या बुंध्याशीच गळून पडलं....
त्याचीही कथा
वृध्दाश्रमात ठेवलेल्या
आजी- आजोबांसारखीच ठरली!

N/A

References : N/A
Last Updated : December 04, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP