निर्मिती कोलते - शब्द त्याला वाहिले अन् सा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
शब्द त्याला वाहिले अन् साध्य केले काय मी ?
छापताना गाळलेला पोरका अध्याय मी !
साचलेल्या जिंदगीची चाललेली कौतुके...
वाहत्या पाण्यात कोठे सोडते हे पाय मी ?
शोध प्रश्नांची तुझ्या संभाव्य सारी उत्तरे
शेवटी उरणार जो, तो एकटा पर्याय मी !
तोडुनी फांद्या हजारो बांधला मी आसरा
सावलीच्या प्राक्तनाला लागलेली हाय मी !
जन्मभर माझ्या सख्याला स्पर्श माझा टोचला...
आणि मी समजून होते की मुलायम साय मी !
राग, मत्सर, लोभ...सारे एकवटले अंतरी
बदलणार्या मुखवट्यांचा बेगडी समुदाय मी !
बेरकीही वाटते मी, भाबडीही वाटते...
मात्र जी दिसते तुम्हाला तीच आहे काय मी ?
न कधी फुटलाच पान्हा, सोसल्या नाही कळा...
दुःख पोटाशी तरी कवटाळणारी माय मी !
पाठ माझी वेदनांचे बोचके सांभाळते...
अन् तिला सांभाळणारी शांत गोगलगय मी !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP