ऋचा कर्वे - आताशा ती नाही काढत मोर्चे...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
आताशा ती नाही काढत मोर्चे वगैरे
नाही घालत कुठंही, कुणाशीही कसलेच वाद...
वर्तमानपत्रातल्या बातम्यांनीही पूर्वीसारखी
आंतर्बाह्य पेटून उठत नाही ती...
अन्याय, स्वत:चं डावललं गेलेलं प्रमोशन,
असं सगळंच सहजपणे स्वीकारते ती..
मग असू देत ते घरातलं, आँफिसातलं, बँकेतलं, शाळेतलं
कुठल्याही कचेरी-कार्यालयातलं...असं कुठलंही...
आणि असू देत ती कार्यरत कुठल्याही हुद्दयावर...
अन् असू देत कुठल्याही वयोगटातली
मोह-माया, मत्सर, लोभ, असूया, हेवे-दावे
याही पलीकडं जाऊन ती रमलीय
आता फक्त तिच्या मोबाईलमधल्या
‘कँडीक्रश’मध्ये...
भराभर पार करतेय ती त्यातल्या
लेव्हल्स
त्यातल्या अवघड आव्हानांसकट...
अन् त्यातच हरवून गेलीय ती...
तिचा सगळा भोवताल विसरुन... !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP