डॉ. सुनंदा शेलके - मी कुठं मागितलं तुझ्याकडं...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मी कुठं मागितलं तुझ्याकडं स्वातंत्र्य ?
मला माहीत आहे
मी देश नाही
किंवा
माझ्याकडं माझा असा वेगळा झेंडाही नाही
मी फक्त मागितली मोकळी हवा
माझ्या श्वासापुरती
आणि मोकळी जागा...
जिच्यामध्ये रेखता यावं मला
तुझ्यासह आपलं सुंदर जग
मी कुठं मागितलं तुझ्याकडं
तुझं सर्वस्व, तुझी सत्ता किंवा तुझी सुबत्ता ?
मी फक्त “ माझाच ‘ स्व ’ माझ्यापुरता हवाय ” म्हणाले
“ माझ्यावर माझी सत्ता राहावी ” म्हणाले
“ माझा पगार मलाही वापरायचाय ” म्हणाले...
तू खूप चाणाक्ष, वाक्चतुरही !
म्हणत राहिलास...
“ आख्खा मीच तुझा असताना
तुला आणखी काय पाहिजे ? ”
किंवा
“ तू माझीच म्हटल्यावर
तुझ्यासह पगारही माझाच ना... ? ”
हसत हसत समर्थनही केलंस
मोकळीच राहिली सारी भाषा
पोकळीसारखी आयुष्यातल्या !
सप्तपदीपासून ते षष्ट्यब्दीपर्यंत
मी चालत राहिले तुझ्यामागून
अंधारात तेवत तेवत
ओठांवर स्मित ठेवत
‘ आपली बायकांची रीत ’ असं म्हणत !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP