प्रमोद धायगुडे - चकचकीत माँलच्या बाहेर बाप...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
चकचकीत माँलच्या बाहेर
बाप बसलाय ऊन्ह झेलीत
ओल्या बारदानातून डोकावणारं माळवं
आणि आवाजाचं काहूर माजवणारा बाप
तंबाटं दहाला पावशेर
वांगी पंधराला पावशेर
कांदं दहाला पावशेर
मेटल डिटेक्टरपासून आत जाताच
एसीच्या धुंदीत चमचमणारी स्वप्नाळू दुनिया....
व्हेजिटेबल्स सेक्शनमधील
रेटकार्डनं सजलेले रसशीत ट्रेज्
डील्स आँफ द् डे....
बम्पर डिस्काउंट वगैरे....
टोमँटो ओन्ली रुपीज् फिफ्टी पर केजी
ब्रिंजल्स ओन्ली रुपीज् सिक्स्टी पर केजी
ओनियन्स ओन्ली रुपीज् फिफ्ट पर केजी
सेव्हिंगचा अदृश्य धबधबा वाहतोय
डेबिट-क्रेडिट कार्ड, वाँलेट व पर्चेस रिसिटवरील
‘यू हँव सेव्ड् रुपीज् टॆन पर्सेंट्स ’ आणि
‘हँव अ नाइस डे ’ च्या गोड मेसेजपर्यंत
बापाचा खंगात चाललेला आवाज...
तंबाटं दहाला किलो...
वांगी पंधराला किलो...
कांदं दहाला किलो...
सायकांळी उजळत चाललेला गुबगुबीत माँल
आणि रस्त्यावरुन पुसट होत चाललेला ..
वामनाच्या असंख्य पायांनी मातीत कणाकणाने मुजत
चाललेला बाप आणि
दोन-तीन किलो माळवं फुकटात मिळालं म्हणून
बापाला दुवा देत खुळावून उडया मारणारा
सिग्नलजवळचा तो भिकारी...
हटत नाही नजरेपुढून अजूनसुध्दा !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP