डॉ. नंदू मुलमुले - खिडकीशी चिमणी यायचं बंद झ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
खिडकीशी चिमणी यायचं बंद झाल्यापासून
मलाही पत्रही यायचं बंद झालयं
आता आठवणीसारखी
जुनीच पत्र शोधत बसलोय
भाऊ पत्र लिहीत असे तेव्हा
त्याच्या ‘ अनेक आशीर्वाद ’ मध्ये
आशीर्वादाचा हात जाणवे पाठीवर
आईच्या पत्राला
स्वयंपाकघरातल्या दुधाच्या कपाटातला
घट्ट सायीसारखा उबदार गंध येई
कानाशी लागून बोलल्यासारखं
ती लिही :
‘ नीट जेवत जा,
प्रकृती सांभाळ
इकडं केव्हा येतोस ? ’
मी यावा; पण ‘ काम सोडून ये ’ कसं म्हणायचं
याची घालमेल
तिच्या अक्षरांत दिसे मला !
आत्याच्या कार्डाच्या कपाळावर
‘ श्री ’ चं गंध !
‘ अनेक आशीर्वाद ’ संपता संपताच
नवर्यानं टाकलेल्या शरीराचं ठुसठुसणं
त्याची पुतण्याजवळ तक्रार
पसरलेल्या शाईचा एक ठिपकाही
कदाचित पाणावल्या डोळ्याची साक्ष देत सोबत... !
आता
कित्येक वर्ष्यांपासून
मला पोस्तकार्ड येणं बंद झालंय
पोस्टमन आताशा फक्त
प्रीमियमच्या नोटिसा
आणि वर्ष वर्ष एकमेकांना न भेटणार्या सुहृदांची
भेटकार्डं तेवढी टाकत असतो...
पोस्टकार्डं
चिमण्यांसारखीच कधी लुप्त झाली आमच्या आयुष्यातून
समजलंही नाही...
आता ई - मेल छातीशी धरून रडता येत नाही
एवढी एक किरकोळ अडचण टोचते कधी कधी
तारेला टोचलेल्या
पोस्टकार्डासारखी... !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP