मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
कधी कधी तुझ्या पत्रांचा ...

प्रा. महेश कुडालीकर - कधी कधी तुझ्या पत्रांचा ...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


कधी कधी
तुझ्या पत्रांचा गठ्ठा घेऊन
वाचू लागतो
तेव्हा मनातली पाखरं
झाडावरून उडावीत
तशी उडू लागतात

मग त्या पत्रांतल्या  
शब्दांच्या ओळीओळीवर
मला आपसूकच दिसू लागते
चंद्रिकेची शुभ्र रिमझिम...
इंद्रधनूची चंचल स्वप्नं...
आणखीही बरच काही असतं
त्या शब्दांच्या रकान्यात

ते शब्दांचे रकाने वाचून होईपर्यंत
झालेले असतात
आपल्या दोघांचे संबंध
काळोखाचे, असहायतेचे...

पुन्हा कधी त्या
मनाच्या काळोख्या अवस्थेत
काढतो मी तो पत्रांचा गठ्ठा
अन्
कधी बैठकीतल्या सोफासेटवर
कधी दिवाणखान्यात झुल्यावर
वाचू लागतो...

तेव्हा
ती पत्रं सोफासेटवर
आपण कुणाची तरी वाट पाहत आहोत, असं भासवतात !
झुल्यावर अधिकच झुलवतात...!
व्हरांड्यात ती बाहेरची धग सोसतात...

आणि
त्या पत्रांमधले शब्द
आता माझ्यात अधिकच डोकावू लागतात
खोलीत एखादी चिमणी
भुर्रकन् प्रवेशावी
तसे !

N/A

References : N/A
Last Updated : August 05, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP