आसावरी काकडे - खचाखच भरलेल्या या बेसुमा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
खचाखच भरलेल्या
या बेसुमार जगात
कुणी एकटं कसं असू शकतं ?
तुमचा हात ठणकला
तर वेगवेगळे
असंख्य ठणके
भोवती डोळ्यात अश्रू आणून
किंवा गिळून
ठसठसत असलेले दिसणार
तुमचं एक पुस्तक प्रकाशित झालं
तर शेकडो पुस्तकांच्या
प्रकाशनाची निमंत्रणं
झळकताना दिसणार
फ़ेसबुकवर...वाँट्सँपवर
तुम्ही महागडी गाडी घ्यायला जा
तुमच्याआधी कित्येक
कित्येक पाठोपाठ...
तुम्ही रेडिएशन घ्यायला जा
सर्व खुर्च्या भरलेल्या
रुमाल बांधलेल्या डोक्यांनी
तुम्ही लग्नाची तरीख ठरवून
कार्यालय बुक करायला जा
सगळी केव्हाच बुक झालेली
तुम्ही माँलमधे जा
महागड्या हाँटेलात जा
सोनं..हिरे..प्लँटिनमच्या खरेदीला जा
अँम्ब्युलन्स मागवायला फ़ोन करा
सोनोग्राफ़ीसाठी अपाँइंटमेंट घ्यायला जा
कार पार्किंगसाठी जागा शोधायला लागा
कोठे असाता तुम्ही एकटे ?
अपघात पुष्कळ आत्महत्या पुष्कळ
अत्याचार पुष्कळ पुरस्कार पुष्कळ
पराभव पुष्कळ भ्रष्टाचार पुष्कळ
झोपडपट्ट्या पुष्कळ टाँवर्स पुष्कळ
रोग पुष्कळ उपचार पुष्कळ
माशा डास बुके शुभेच्छा....
पुष्कळच गोष्टी पुष्कळ पुष्कळ
अनावर श्रीमंती अनावर दारिद्र्य
अनावर उन्माद अनावर प्रमाद
अनावर वेदना अनावर याचना
अनावर झगमगाड अनावर अंधार
वाटलं तरी तुम्ही एकटे राहू शकत नाही
या अनावर पुष्कळांत..
राहून पहा
शेकडो आवाज कानांवर आदळतील
डोळे मिटून घ्या, तरीही
दृश्यांची गिचमिड सरकत राहील समोर
आक्रसून घ्या स्वत:ला
कसले कसले स्पर्श बिलगत राहणार
सर्वांगाला
वास शिरणार नाका-तोंडात
विचार धिंगाणा घालणार डोक्यात
या सतत जोडलेपणातून
तुम्ही तुटून बाहेर पडूच शकणार नाही
या अखंड अतूट सलग विश्वात
कुणी अगदी एकटं
असूच कसं शकेल ?
आयुष्यात कधीही
इथे येण्यापूर्वी
किंवा इथून गेल्यावरही ?
N/A
References :
९७६२२०९०२८
Last Updated : November 11, 2016
TOP