संगीता जोशी - जे झाले ते उत्तम झाले दूर...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
जे झाले ते उत्तम झाले
दूर अता सारे भ्रम झाले
वादळलाटा झेलुन झेलुन
हृदयाचे तट भक्कम झाले
अवचित पाउस, अवचित थंडी
लहरी आता मोसम झाले
जखमा सहजी सोसुन झाल्या
मात्र लपविताना श्रम झाले
आदर नुरला नात्यांमधला
जिथे तिथे वृद्धाश्रम झाले
वारावर प्रतिवार कराया
मीही आता सक्षम झाले
राष्ट्र नवे होईल उद्या ते
जर जातींचे संगम झाले
‘ मी - माझे ’ टाकून दिले अन्
तुझ्या कृपेने निर्मम झाले !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP