व्दारकानाथ बिवलकर - रात्रभर तुझ्या आठवणींनी श...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
रात्रभर तुझ्या आठवणींनी शिणलो.
पहाटे पहाटे मी पारिजातकाचं झाड झालो.
बरसत राहिलो तुझ्या अंगणात एकेका फुलातून.
तुझी पावलं लालसर दिसतायेत
ती प्राजक्ताची फुलं तू तुडवून गेलीस म्हणून.
माझ्याशी न बोलता निघून गेलीस.
मला माहीत आहे तू असशील
त्या बटबटीत, भडक कर्दळीच्या फुलाशी बोलत परसदारी.
मग मी सकाळच्या कोवळ्या उन्हात मिसळून
उंबरा ओलांडून घरात आलो.
तू कुठं दिसलीच नाहीस.
जुन्या घडयाळाच्या हलणार्या टोल्यासोबत
माझा जीव पुढं-पाठी होत राहिला.
हातात वाढलेलं पान घेऊन तू अंगणात आलीस
तेव्हा मी मोठा ढग झालो
आणि
माझ्या सावलीत मी तुझ्याकडं बघत राहिलो.
कुठूनतरी एका आगाऊ कावळ्यानं
तुझ्या हातावर झडप घातली
आणि
तू घाबरुन घरात गेलीस
मी पुन्हा रागानं ऊन्ह
झालो
तू आरशासमोर उभी राहून
कुंकू लावलंस
तेव्हा थोडसं साडलं
तुझ्या नाकाच्या
शेंडयावर.
त्या सांडलेल्या
कुंकवात मी होतोच
तू जा कुठंही...मी
असतोच तिथं
काल दुपारी कशिदा
करताना
टचकन् लागलेल्या
सुईमुळं
तुझ्या बोटातून रक्त आलं
त्या लालबुंद थेंबातही मी होतो
तू देवापुढं हात जोडतेस
तेव्हा एक हात माझा असतो.
दुसरा हात माझ्या हातात आहे,
असं मी मला समजावतो.
तू भेटत नाहीस
मग मी रागवतो आणि भरदुपारी पळस होऊन
माळावर फुलत राहतो...
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP