अशोक कोतवाल - मी बोलतो जेव्हा मला बोलाव...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
मी बोलतो
जेव्हा मला बोलावंसं वाटतं
ज्यानं हलतो हवेचा पडदा जरा तरी
अथवा उठतात लोट ध्वनींचे
आदळतात कुठंतरी
मी बोलतो तेव्हा थांबतात
कुणी जाणारे
बघतात काहीजण माना वळवून
हसतात कुणी
काढतातही काहीजण मला वेड्यात
मी बोलावं
अन् असंच बोलत राहावं काहीतरी
वाटत असतं अनेकांना
‘ आपलंच तर बोलतो हा ’ असं वाटून
सुखावतातही काहीजण
मी बोलावं की बोलू नये ?
असा एक तर्कही आहे अनेकांमध्ये
वाटतो मी कुणाला
एक मिशन
तर कुणाला त्यांचाच एक मतवादी
पण ते काहीही असो
मी बोलतो आणि बोलतच राहीन
चित्ताची धूळधाण करणार्या
माझ्या या समकाळाविषयी...
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP