नलेश पाटील - तंबोर्याच्या तारेवरी कोक...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तंबोर्याच्या तारेवरी कोकिळेचा हेलकावा
तबल्यावरी काळा डोह, त्यात माझा तोल जावा
सातरंग भाराने ते, आकाशात वाकलेले
हिंदोळ्या गं पानावरी दवबाळ निजलेले...
मल्हाराला आळवीत मेघदूत चाललेले
डोंगराच्या कानापाशी ताना घेत रेललेले
डोंगराचे नाव त्याने कालिदास ठेवलेले...
तळी तुंबलेली होती, झाडे चिंबलेली होती
भिजलेल्या पानांमध्ये ओली सळसळ होती
पाखरांचे डोळे निळे...स्वप्न जुळे नाहलेले...!
ओथंबल्या आभाळाचे कृष्णरूप अवतरले
धुक्यातले गूढ रान राधेवाणी थरथरले
नभाने क्षितिजाआड जोरून हे पाहिलेले...
पावसाच्या धारेवरी गवताची मान हले
रिमझिम तालावरी सारखे ते ‘ हो हो ’ बोले
गर्द हिर्व्या गुंत्यामध्ये रानफूल गुंतलेले...
पावलांच्या खुणांमध्ये साचले आकाश होते
चालताना कळले, ते आकाशाचे पाय होते
आता आकाशाएवढे तुक्या हेचि काव्य झाले...!
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP