प्रफुल्ल कुलकर्णी - ताकावरती येते लोणी खूप घु...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ताकावरती येते लोणी खूप घुसळल्यावर
वाटेचा हमरस्ता होतो बरेच मळल्यावर
गांभीर्याने नकोस घेऊ ऊन्ह - सावलीला
दोघांचेही चित्र बदलते दुपार टळल्यावर
कधी अता संपेल आरती, वाट बघे तीही...
ज्योतीलाही खरेच येतो थकवा...जळल्यावर !
अंतर्मन अन् वर्तमानही स्वच्छ स्वच्छ होते
गतकाळातिल सुखद क्षणांनी दुःख विसळल्यावर !
परिश्रमाचा सुसाट वारू, लगाम धीराचा...
घामालाही सुगंध येतो जरा निथळल्यावर
बंधन किंवा नियम पाळणे...कमीपणा कसला ?
आयुष्याची फरफट होते स्वैर उधळल्यावर !
पुढे चलावे घेण्यासाठी वेध भविष्याचा
जुनाच रस्ता पुन्हा सापडे मध्येच वळल्यावर !
कठोरतेच्या निकषावरती सिद्धी ये दारी
दुधास लाभे खरी सुरक्षा पूर्ण उकळल्यावर
कसे सुटावे समर्पणाचे पापभीरू कोडे ?
दोघांमधला अद्वैताचा दुवा निखळल्यावर
आशा आणिक निराश्याचा लपंडाव सारा
ब्रह्मांडाचे दर्शन होते मेघ निवळल्यावर
विस्ताराच्या स्वप्नासाठी विस्थापित व्हावे
थेंबालाही समुद्र म्हणती...त्यात मिसळल्यावर !
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP