संतोष पद्माकर पवार - ते वड नावाचं एक झाड आहे न...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ते वड नावाचं एक झाड आहे
नवख्या चित्रकारानं हिरव्या रंगात रंगवलं
तर कोथिंबीरीची जुडी वाटण्याचीच शक्यता जास्त आहे...
आणि गावातल्या बहुतांश बायकांनी आज
त्याला किराणा दुकानात असलेल्या पुडा
बांधण्याच्या दोर्यानं करकचून बांधलं आहे...
म्हटलं तर कुण्या नवख्या कवीनं ते चित्र पाहून हेच
म्हटलं असतं : ` बघा, बायकांचं सारं
पतिव्रतापण त्या कोथिंबिरीच्या जुडीला बांधलंय ... '
तिथं पूजापाठ सांगत बसलेल्या
पुजार्याव्यतिरिक्त वडासह सर्व बायका
अनभिज्ञ आहेत, की काय गौडबंगाल असावं या सणाचं ... !
तो वड, पुजारी, बायका हे सगळं दृश्य
कुण्या नवख्या मूर्तिकारानं पाहिल तर तो नक्कीच
त्या सगळ्या माहौलास पाहून फक्त एक
चिखलाचा गोळा तयार करून मांडील
संस्कृतीला श्रद्धांजली म्हणून...
आणि हे सर्व चित्रकार, कवी, मूर्तिकार आपली
कल्पना घेऊन गेले नवख्या संगीतकाराकडं तर तो
केवळ बायकांच्या वाजणार्या हाडांचं संगीत ऐकवील...
आणि मग पुजरीवगळता सगळेच होतील अचंबित
रक्त - मांसाची चव चाखणार्यांना कधीच नसतात संवेदना
आणि ज्यांनी खूप काही करायला पाहिजे
ते समाजपुरुष वडासारखे करकचून बांधले गेलेले असतात...
आणि कलावंत ? ते दरपिढीत कलाच सांगत
असतात; समाधान नव्हे ... !
आणि उरल्या त्या बायका...
इतिहासानं त्यांना तर मनाई केलीय
या चित्रातून बाहेर पडायला ... !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP