नवनाथ माझिरे - ती शाळेकडची चिंच अजूनही त...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ती शाळेकडची चिंच
अजूनही तशीच उभी आहे
प्रेमळ सावली देत वर्षानुवर्ष
शाळकरी पोरांच्या कित्येक पिढ्या
तिनं अंगा - खांद्यावर खेळवल्या
हिरवीकोमल माया देऊन कुशीमध्ये वाढवल्या
अन् साक्षरतेचे धडे गिरवताना
मोठ्या होताना पाहिल्या
आताही लहान लहान पोरं
तिच्या चिंचा पाडायला धडपडतात
इवल्या इवल्या हातांनी
दगड उंच भिरकावतात
चिंचा खाली पडताक्षणी
जोरजोरानं चेकाळतात
मोठ्यांना त्यांच्या लहानपणाची आठवण देतात
सकाळची अर्धी शाळा
तेव्हा तिच्याच छायेत भरायची
कोवळ्या उन्हाची पिवळी किरणं
तिच्या फांदीफांदीतून झिरपायची
निरनिराळ्या पक्ष्यांची संगीतगाणी तिथं घुमायची
छोटी खारूताई शिवणापाणी खेळायची
मित्र - मैत्रिणींपुढं तेवढ्यापुरता भाव खायला
आम्ही तिचाच आधार घ्यायचो
चिंचेचा घेरदार खोडावर
मोठ्या कष्टानं चढायचो
गाभुळलेल्या आंबट - गोड चिंचा
खिसे भरभरून काढायचो
खाऊन - खिलवून तृप्त व्हायचो...
पण उंच शेंड्यावर जाऊनही
मोठा भाव कधी खाता आला नाही
तिथून दिसणारा गावाचा नकाशा
कधी आकाशातून पाहता आला नाही !
ती शाळेकडची चिंच...
अजून तशीच उभी आहे...
निर्विकार...
पण प्रेमळ सावलीची !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP