डॉ. सुनीता बोर्डे - हे बघ, मला नाही आवडणार भर...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
हे बघ,
मला नाही आवडणार
भर रस्त्यात, चौकात
तुझं असं झपाटल्यागत भेटणं
चारचौघांत झडप घालून
घट्ट कवेत घेणं...
यायचंच असेल तुला तर
मी सांगते, तसा ये!
अगदी मध्यरात्री अंधारात
सगळे गाढ झोपेत असताना
हळूच पाय न वाजवता ये...
दाराबाहेर मॅटखाली बघ...
तिथं किल्ली ठेवलेली असेल...
हळूच दार उघड
हॉलमधून बेडरूमकडं वळ...
आताशा मी दाराला
लावलेलीच नसते आतून कडी
पण तू काळजी घे
दार कुरकुरणार नाही याची..
मंद निळसर उजेडात
निरखून पाहा क्षणभर माझा चेहरा
झालाच तर टाक एक कटाक्ष
शेजारीच झोपलेल्या माझ्या पतीवर...
पलीकडंच असतील गाढ झोपेतली
माझी दोन पिल्लं...
त्यांच्याकडं पहून बुजलास तर
मग आलास तसा हळूच माघारी जा...
अन नसलासच जाणार माझ्याशिवाय तर
मग मला अलगद उचलून कवेत घे...
आलास तसा पाय न वाजवता बाहेर पड...
पुन्हा दार बंद करून
किल्ली मॅटखाली ठेवायला मात्र
विसरू नकोस...
बघ...
असा शहाण्यासारखा वागलास
तर मग
कुणाची बिशाद आहे
’मृत्यू वाईट असतो’ असं म्हणायची!
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2017
TOP