भूपेंद्र नारायण यादव - या धरित्रीच्या कुशीत विसा...
अनुवादित
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
या धरित्रीच्या कुशीत विसावलेल्या
मऊ, मखमली हिरवळीवर
मोत्यासारख्या चमकणार्या दवबिंदूंवर
पहाटे पहाटे
लिहिलं आहे मी तुझं नाव...
पर्वतरांगांच्या शिखरांवर
मोरपंखी झाडांच्या पानांवर
समुद्राच्या उधाणावर
सप्तसुरांच्या लकेरींवर, सुरावटींवर
चित्रदर्शी मेघांच्या किनारींवर
निळ्या आकाशाच्या विशाल कॅनव्हासवर
लिहिलं आहे मी तुझं नाव...
कोशी नदीच्या पात्रात
मत्स्यवेधासाठी
एकाग्र झालेल्या बगळ्यांच्या ध्यानमुद्रेवर
शेवालाच्या जाळीतून झरणार्या पातळशा जलधारेवर
लिहिलं आहे मी तुझं नाव...
नदीच्या काठावर ओठंगलेल्या
वटवृक्षाच्या नाजूक डहाळ्यांवर
निबर - जून फांद्यांवर
पक्ष्यांच्या रंगीबेरंगी पंखांवर
प्रेमकूजन करणार्या त्यांच्या किलबिलाटावर
लिहिलं आहे मी तुझं नाव...
कोशीच्या निर्मनुष्य किनार्यावर
धुराचा पडदा भेदत
धगधगत्या चितेतून निघून
त्या देखण्या मेघमालेपर्यंत
स्वतःची वाट निर्माण करत
वर वर झेपावणारे ते निळे - पिवळे अग्निलोळ...
त्या अग्निलोळांवर
त्यांनी निर्माण केलेल्या त्या गगनगामी वाटेवरही
लिहिलं आहे मी तुझं नाव...माझ्या नावासह
थरथरत्या हातांनी... !
N/A
References : N/A
Last Updated : December 04, 2016
TOP