प्र. सतीश देवपूरकर - एकाच तुझ्या दुःखाने जन्मा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
एकाच तुझ्या दुःखाने जन्माची सोबत केली !
तू नव्हे, तुझ्या स्वप्नाने जन्माची सोबत केली !
तू झुळुक कोवळी बनुनी बिलगलीस मज त्या रात्री
पळभरच्या सहवासाने जन्माची सोबत केली !
वळणावर अवघड एका सोबती पळाले सारे
पण त्याच बिकट रस्त्याने जन्माची सोबत केली !
संपला चार दिवसांचा दीपोत्सव आयुष्याचा
मग एका काळोखाने जन्माची सोबत केली !
पकडून बोट वार्याचे तो सुगंध निघुनी गेला...
पण रुतलेल्या काट्याने जन्माची सोबत गेली !
वाटेवर अर्ध्या झाला घायाळ पंख सोनेरी
पण मातीच्या पायाने जन्माची सोबत केली !
ते दिवस गुलाबी गेले...काळाच्या पडद्यामागे
पण स्मरणांच्या गंधाने जन्माची सोबत केली !
वठलेल्या झाडावरती बहराची एक निशाणी
पिकलेल्या त्या पानाने जन्माची सोबत केली !
वळचणीसही कोणाच्या आसरा मिळाला नाही
भिरभिरणार्या वार्याने जन्माची सोबत केली !
कापली याच बळावर अंतरे प्रकाश्वर्षाची...
आशेच्या त्या किरणाने जन्माची सोबत केली !
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP