धनंजय तांदळे - ज्या फांदीवर घरटे होते, त...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
ज्या फांदीवर घरटे होते, त्या फांदीला मोहळ
उगा दिला रे आयुष्या तू असा मधाचा ओघळ
कळी मनावर घेतच नाही ऋतू कोणता हल्ली
तिच्या भोवती किती धरावी मी श्वासांची ओंजळ ?
काट्यांभवती वावरलो मी फक्त फुलांच्यासाठी
कुणी म्हणे पण : ‘ खुळा भ्रमर हा मिठीत घेतो बाहळ ! ’
या जन्मातिल जगण्याचाही ऋतू पालथा गेला
चला, निघावे रिती घेउनी आयुष्याची सागळ* !
चुकून रस्ता एक चांदणी करत असावी ये - जा
उगाच येते काय नभाला हल्ली हल्ली भोवळ !
झुळूक करते मलाच आता विझवायाची भाषा
कालच तर या मांडीवरती निजून गेले वादळ !
पुन्हा एकदा जन्म जाळण्या उठून आलो असतो...
तुझ्याहुनि पण उत्कट होती त्या मृत्यूची तळमळ !
चुकून परक्या क्षितिजावरती मावळतीला आलो
अन् परतीच्या वाटेवरती सांजभयाची कर्दळ !
( * जुन्या काळातलं एक भांड )
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP