मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नव कवी|
...त्या रस्त्याच्या आडाबा...

श्यामसुंदर मुळे - ...त्या रस्त्याच्या आडाबा...

एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.


...त्या रस्त्याच्या आडाबाजुला
जुना - पुराणा वाडा पडका
एकटाच तो झुरतो आहे
जणू स्वत:ला होउन परका !

आड आटला, गाळ साचला
रहाट मोडुन उलटा पडला
खाली बळदामध्ये तळाला
दगड - विटांचा ढीग माजला

तुळशी...वृंदावनीं जळाली
काटेरी निवडुंगे रुजली
खिडक्यांची दारे कोसळली
काप जाउनी भोके उरली

त्या वाड्यावर एकेकाळी
सलज्ज हितगुज, वर्दळ होती
संध्याकाळी घुमावयाची
चिमण्याओठी ‘ शुभं करोति ’

त्या वाड्यावर एकेकाळी
तरुणी होत्या बागा शिंपत...
त्या वाड्यावर आजघडीला
कुणि म्हातारी गवर्‍या थापत...!

त्या वाड्याच्या उदरी दडले
आठवणींचे उदास संचित
कुणी न फ़िरके आता तिकडे
एकटाच तो... पदववंचित !

असे ऐकले : ‘ त्या वाड्यावर
भुते नाचती दर अवसेला ’
फ़ुटत राहती पाय सारखे
अशाच कुठल्याशा अफ़वेला !

त्या रस्त्याच्या आडबाजूला
उभा असे तो वाडा पडका...
वाट पाहतो : कधी व्हायची
जीर्णावस्थेमधून सुटका !

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP