मकरंद शांताराम - अजूनही मज आठवते ते गावाक...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
अजूनही मज आठवते ते
गावाकडचे टिपुर चांदणे
प्रकाश भवती धवल रुपेरी
गगनामधुनी सुधा सांडणे !
घरे, देवळे, झाडे, रस्ते
न्हाउन जाई अवघे स्थिर - चर
रुक्ष भासते दिवसा जे जे
रात्री ते ते अतीव सुंदर !
इष्टापत्ती यातच यावी...
म्हणिजे बिजली पसार व्हावी !
भगभगणार प्रकाश जाउन
अर्धसावळी प्रभा वसावी
अर्धसावळ्या वातावरणी
गूढ दिसावी सगळी सृष्टी
जवळ येइतो उमगु न यावी
जिवलग मित्राचीही यष्टी !
माळवदावर बैठक रंगे
स्नेहाला ये नवी झळाळी
तासावरती तास सरकती...
भान कशाचे ऐशा वेळी ?
विंझणवारे अशात येती
जणू दुधाच्या वाटित साखर
संगे त्यांच्या वाहत येती
भजनाचे आश्वासक सुस्वर
हळूहळू मग पसरे शांती
चंद्र कलंडे मावळतीला
स्वप्नांची पांघरून दुलई
निजे रात्रही मध्यरात्रीला !!
N/A
References : N/A
Last Updated : August 05, 2017
TOP