डॉ. दीप्ती गुप्ता - तू माझ्या हृदयाचे स्पंदन ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तू माझ्या हृदयाचे स्पंदन
तू प्रकाश माझ्या नयनांचा
तू माझ्या हृदयाचे स्पंदन
तू माझ्या संतत श्वास श्वास
तू माझ्या देहात जीव - प्राण
या गगनाला जशी निळाई
जशी सागराला गहराई
फुलात असते जी कोमलता
कोंभामध्ये जशी मृदुलता
तसाच माझ्या उरी - अंतरी, मनी - मानसी तू
***
तू स्निग्ध चंद्र, मी तुझी चांदणी
तू दीप, तेवती तुझी ज्योत मी
श्रावणसर मी रिमझिमणारी
मेघात बघे तुज ओतप्रोत मी
सूर्य - उषेचे, भ्रमर - फुलाचे
ऋतुराजाचे अन् गंधाचे
तसेच नाते तुझे नि माझे
भक्तीचे अन् ऋणबंधाचे
सदैव माझी सोबत करुनी छाया बनसी तू
***
दुःखाचा तू धीर मनस्वी
आनंदच माझा सर्वस्वी
माझी संपन्न जाणीव तू
माझ्या मनाची शहाणीव तू
बिंब झळकते दर्पणातले
रंग मिसळते जलातले तू
हातावरचे भाग्य चमकते
रूप ईश्वरी जगातले तू
क्षणोक्षणी तू माझ्यासोबत, समीप असशी तू
N/A
References : N/A
Last Updated : March 09, 2017
TOP