विजय वाकडे - तीर्थरूप, काळाची फट वाढत ...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
तीर्थरूप,
काळाची फट वाढत गेली
संवादाची दरी रुंदावत गेली
दोन पिढ्यांचं अंतर, जनरेशन गॅप वगैरे म्हणत
बिंदूबिंदूनं सरकत गेलो तुमच्या बिंदूतून
आकारलेलं अस्तित्व गणिती प्रमेयात सामावलं नाही
इतिहासाची पानं आता जीर्ण झाली
भूगोल फारसा बदलत नासतो
( झालेच तर नकाशे लहान होतील )
तीर्थरूप,
तुमच्या अकराशे चाळीस महिन्यांच्या
भरगच्च झाडालाही पानगळ लागली
निष्पर्ण होत होत
भर पावसात एक झाड उन्मळून गेलं
तेव्हा नाही जाणवला (भू)कंप, थरथर...रानभर
तीर्थरूप,
आता माझ्या पडीच्या दिवसांचा
हिशेब मांडत असताना का कुणास ठाऊक
जमेच्या बाजूला
डबडबलेले डोळे शोधतात
त्या जखमांच्या खपल्या
घामाचे थेंब
अन् असंच काही काही...
हातचं गमावलेलं...बरचसं !
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP