बाबा चव्हाण - निसर्गाच्या करणीची आणि मा...
एकविसाव्या शतकात मानवाच्या वाट्याला आलेले एकाकीपण कित्येक कवींनी त्यांच्या एकेका कवितेने भरून काढले.
निसर्गाच्या करणीची आणि
माणसाच्या नजरची भाषा
जरा लवकर शिक !
शेतकर्याचा पोरगा हायीस,
शाळा सुटल्यावर,
बघत जा, जरा घराकडं.
बाप असं काय बाय बोलायचा,
आन् वाळल्याली काटकं मोडायचा.
ज्या दिवशी त्यानं गळ्याला
फास आवळला.
त्याच्या दुसर्या दिवसापास्नं
मी सारं आठवाय लागलो.
जो कधी येत नव्हता,
आता त्यो बी येतो घराकडं.
बोलता बोलता रोखून बघत असतो
आईच्या उराकडं !
कापसाच्या वाळक्या रोपावानी
माय थरथरत असते.
राती चुकून माझा हात लागला
तरी किंचाळत उठते !
आता शाळंच्या मधल्या सुट्टीतही
मी खेळत बसत नाय कुठं,
घराकडं येतो.
आन् तू सांगितला तसाच बाबा,
पिकांचा, पाण्याचा,
हवामानाचा, माणसांचा
अंदाज बांधायला शिकतो.
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP