भावगंगा - इथे उभारू उपवन सुंदर
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
इथे उभारू उपवन सुंदर
या विश्वाचे अभिनव मंदिर ॥धृ॥
सर्वांमूतीं माझी वसती
तरू-लतेतही माझी विभूती
सांगे गीता सोपी भक्ती
रोप नव्हे हे मूर्ती मनोहर ॥१॥
तरुबाळे हीं गोजिरवाणी
पूजू त्यांना भक्त होउनी
कृष्ण वाढवू वनीं काननीं
होऊ यशोदा नित्य निरंतर ॥२॥
मालक होउन कुणी न वागू
मजूर म्हणुनी कुणी न राबू
सर्व पुजारी होउन गाऊ
‘इदं न मम’ हा मंत्र शुभंकर ॥३॥
योगी होउन मोर नाचवू
मंत्र आळवित मेघ बरसवू
शुक-साळुंक्या ज्ञानी बनवू
भक्तिरसाच्या पैल तटावर ॥४॥
या विश्वाला तपास बसवू
स्वार्थरहित माझेपण शिकवू
मरुभूमीवर भक्ती पिकवू
पाहुनिया नाचेल महेश्वर ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP