भावगंगा - अनंत आहे मानवजाती
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
अनंत आहे मानवजाती, असंख्य होती गाठीभेटी
परी तुझ्यासम मी न पाहिली विशुद्ध मानव्याची मूर्ती ॥१॥
तुला न उपचारांच्या भिंती, तुला न संकेतांच्या रीती
तुझ्या मनाच्या मानसतीरी. नित्य लहरती अमृतवीची ॥२॥
स्वजनांहूनी अधिकच प्रेमळ, सुहृदांहूनही अधिकच स्नेहल
तुझ्या संनिधीं ज्योत्स्ना शीतल चित्त विकसते कमलदलासम ॥३॥
मंदाकिनीच्या पुण्यदर्शने सहजी चित्ता पावनत्व ये
तसेच काही तेज आगळे प्रतीत होते तुझ्या दर्शने ॥४॥
आत्मतत्त्व ते विसरे मानव, क्रूर जाहला, झाला कातर
त्या राखेवर घालुनि फुंकर नित्य फुलविशी ज्योत शुभंकर ॥५॥
त्या ज्योतीतच मानव प्रगती, त्या ज्योतीतच अखंड शान्ती
सौख्यसागरा तेथे भरती तत्संवर्धन हीच संस्कृती ॥६॥
वेदान्ताची पावन गंगा प्रति बिंदूतून शान्तिसौख्यदा
कलिप्रभावे लुप्तप्राया तुझ्या प्रयासे घेते ओघा ॥७॥
अतर्क्य केवळ तव प्रज्ञाबळ, अगाध तुझिया करुणेचे जळ
जीवनदृष्टी तशीच उज्ज्वल विरळातहि हा विरळ समन्वय ॥८॥
लाभो तुजला आयु निरामय धर्मध्वज करिं विलसो मंगल
अवताराची नांदि घुमो नव, मानव जगतो ज्या श्रद्धेवर ॥९॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP