भावगंगा - आई तुझा खट्याळ कान्हा मी होणार
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
आई तू यशोदा होऊन ये ना,
आई तुझा खट्याळ कान्हा मी होणार ॥धृ॥
रानावनात जाईन, गाई गुरे राखीन
गोड पावा वाजवित मी येणार,
आई तुझा खट्याळ कान्हा मी होणार ॥१॥
सान थोर गोपाळ, चेंडूफळी खेळतील
दही दूध चोरुन मी वाटणार,
आई तुझा खट्याळ कान्हा मी होणार ॥२॥
शंखनाद घुमवीन, असुरांना लोळवीन
सकलांना अभय मी देणार,
आई तुझा खट्याळ कान्हा मी होणार ॥३॥
संस्कृतिला रक्षिण्यास, विकृतिला पळविण्यास
गीतेचे पालन मी करणार,
आई तुझा खट्याळ कान्हा मी होणार ॥४॥
घरोघरी जाईन, गीता मी गाईन
कान्ह्याचा मी योगेश्वर होणार,
आई तुझा खट्याळ कान्हा मी होणार ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP