वेद सांगती, गीता गाते घ्या रे मंगल नाम
शान्तिनिकेतन परंधाम ते आत्म्याला आराम
परंतु गाते भीमा, कृष्णा, गोदा सुंदर नाम
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥धृ॥
निर्झर फिरती, साळी हंसते, डुले हरभरा छान
गहू, जोंधळा सांगे सगळे, मागा रे वरदान
परंतु गाते भीमा, कृष्णा, गोदा सुंदर नाम
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥१॥
सह्यगिरीचा पत्थर काळा, रमतो काळाराम
वसंत फुलतो, गंध दरवळे, किमया करतो काम
परंतु गाते भीमा, कृष्णा, गोदा सुंदर नाम
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥२॥
भक्त सांगती, सर्व मानिती, देवाविण ना स्थान
सकलांचा आधार एकला अंतिम धाम महान
परंतु गाते भीमा, कृष्णा, गोदा सुंदर नाम
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥३॥
गुपित आगळे, उलट रीत रे समजुन घेई सजाण
मस्ती नको रे, अपुरी शक्ती, जाण यातले ज्ञान
शतके गेली भीमा, कृष्णा, गोदा गाते नाम
निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ॥४॥