भावगंगा - संक्रांतीचा काळ
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
संक्रांतीचा काळ सुमंगल क्रान्तीचे आव्हान रे
भक्तीच्या शक्तीने त्याला दाखवू आपुले प्रेम रे
वन्दे जगद्गुरुम् कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ॥धृ॥
कर-कर जोडुनि प्रेम-शृंखला बनवुनि दृढतर होउया
राग-द्वेष सांडूनि मनातिल सान-थोर-पद विसरूया
जिवलग होऊ जीवासाठी जीव आपुला अर्पूया
कर्मयोग-व्रत आ,चरुनीया काम प्रभूचे करुया रे ॥१॥
संगे संतांच्या राहुनिया सुविचारांना सेवूया
खोट्या रूढी टाकू सगळ्या खऱ्या भक्तीला जाणूया
ज्ञानाचा रविप्रकाश मिळवुनि अंधाराला हटवूया
दूर सारुनी जीवनातला आळस पुढती जाऊ रे ॥२॥
तिळातल्या स्नेहास साठवुनि विश्व-कुटुंबा स्थापूया
गुळातला गोडवा घेउनी गोडी जीवनिं आणूया
तुपातल्या पुष्टीने दृढता मन-बुद्धीला देऊया
तिळगुळ घेउनि नक्की करुया ‘बंधू-भगिनी’ नाते रे ॥३॥
सुरंगी जीवन पतंग बनवुनि भावाकाशीं उडवूया
ज्ञान, भक्ती अन् कर्म गुणांचा दोरा त्याला बांधूया
दोरा देउनि प्रभु-हातामधिं उडत उडत मग विहरूया
अहंकार टाकुनी लाडके प्रभूचे आपण बनुया रे ॥४॥
N/A
References : N/A
Last Updated : October 06, 2023
TOP