भावगंगा - साधेल योग मज भजनाला
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
मन बांधु जरी हरिचरणाला
साधेल योग मज भजनाला ॥धृ॥
सृष्टी विनटली विविध रूपांनी
धारक, तारक प्रकृती कलांनी
अलगद हलतो ईश आतुनी
ही कळलि जादु जर सुमतीला
साधेल योग मग भजनाला ॥१॥
सुगंध दरवळे भूमीमधला
रस निर्मळ जो पयात भरला
विविध रूपांमधि एकच उरला
हा भाव एक जर दृढ झाला
साधेल योग मग भजनाला ॥२॥
परी जिवाला माया-ममता
त्रिविध ताप पाठवी भेटता
त्रस्त बापुडा कुणी न त्राता
हे कळेल ज्याला तो सुटला
साधेल योग मग भजनाला ॥३॥
एकरूप मन हरीत शिरले
एकरूप मन हरि-गुण ल्याले
एकरूप मन हरीच बनले
तर प्रश्र्न पळाला, भ्रम सुटला
साधेल योग मग भजनाला ॥४॥
लोकमहेश्वर रूप प्रभूचे
सर्वव्यापी तो चिन्तन त्याचे
घडता पळतिल ताप जिवाचे
ही कळली इतुकी सहज कला
साधेल योग मग भजनाला ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 03, 2023
TOP