भावगंगा - उठ उठ योगेश्वरा !
स्वाध्याय-प्रेमाने तुडुंब भरून वाहणारी ही भावगंगा आहे.
उठ, उठ योगेश्वरा ! उठ, उठ योगेश्वरा || धृ ||
गुलाब-कान्ती उषा पातली प्राचीच्या द्वारी
तरूतरूवर तुरे डोलती सोनेरी, भरजरी
निळया घनांना पहा लाभल्या लालचुटुक झालरी
आम्रशिरी गातसे कोकिळा; उठ, उठ योगेश्वरा ॥१॥
दर्शनोत्सुका उठल्या लतिका मंद मंद डोलती
सुगंध उधळित फुलल्या कलिका, पर्णांशी खेळती
हिरव्या, पिवळ्या, निळ्या, जांभळ्या कितिक पहा पंगती
सर्व डोलती, सर्व बोलती; उठ उठ योगेश्वरा ॥२॥
नवा दिवस अन् नव्या कामना 'करदर्शनिं' दिसल्या
कर्तृत्वाच्या आशा बहरून मनामधी घुसल्या
ध्येयपथावर उभ्या पहा या नाजुकशा बाहुल्या
डोळे मुरडित, ठुमकत म्हणती उठ उठ योगेश्वरा ॥३॥
भाविक, तापसि पदकमलें ही वळली बघ राउळी
नजर याचिते त्यांची देवा ! तुझीच रे साउली
मांडी वळली, ध्यान, समाधी इथे जरी लागली
आतुर उठतो तरी साद हा; उठ उठ योगेश्वरा ॥४॥
तू दिसता अति शान्त बैसतिल मनातल्या वासना
लोभस रूप न्याहाळित हसतिल डोळयांच्या भावना
हृदय हरखता नुरतिल त्यांना कसल्याही यातना
कळवळुनी ही तरी प्रार्थना; उठ उठ योगेश्वरा ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : September 01, 2023
TOP