मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ३७६ ते ३८०

पदसंग्रह - पदे ३७६ ते ३८०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ३७६.
तुझेंचि सुख तूं पाहीं रे ॥ आणिक सुख तों नाहीं रे ॥धृ०॥
आपुलेंचि सुख कैसें आपणचि भोगुनि प्रपंच सुखरुप मानी रे ॥
द्वैतपणें भोगितां विनाश अढळें तळमळ होय निदानीं रे ॥१॥
मूळचि सांडुनि वरदळ पाहतां दु:अख होय अविवेक-संगें रे ॥
त्रिपुटिचा भावाभाव करुनि निजानंद सुखीं रंगें रे ॥२॥

पद ३७७.
साधुसंगें विचारीं वारिं छंदा ॥ वंदी गोविंदपदारविंदा ॥
भवसामर परपारदुरत्यय कां भुललासी भाग्यमद मंदा रे ॥धृ०॥
श्रीहरिची श्री आपुलि मानुनी करिसी नाना छंदा ॥
हरी विमुख तया श्रीही परांमुख साधिलें काय मतिमंदा रे ॥१॥
संपत्ति तों सकळहि सहवासी निधनीं करिती निंदा ॥
नयेचि त्रास रे स्वहितीं उदारें विसरोनि आनंदकंदा कदां रे ॥२॥
देहीं तापत्रय काळहि निर्दय आला निकट करुं द्वंद्वा ॥
मायिक रंग विरंग निदानीं जाय शरण निजानंदा आनंदकंदा रे ॥३॥

पद ३७८.
मन भुलोनि भरलें रानीं ॥ झालें मोहमदिरापानीं ॥
करुणानिधि श्रीराम उपेक्षुनि विषय पियुषवत्‌ मानीं मानी रे ॥धृ०॥
आयुष्य गिळिलें काळें आलें सन्निध मरण न मानी ॥
संभ्रम वैभव सुत कामिनिचा शेवट एक निदानिं निदानीं ॥१॥
दुस्तर संसारार्णव जाणुनी झाले सावध ज्ञानी ॥
निजानंदें रंगले डोलती खेळति अचळ विमानीं ॥२॥

पद ३७९.
न पडेचि अझुनी ठावें ॥ कांहीं हिताहित स्वभावें ॥
विवरुनी पाहतां भावें ॥ रे त्यजुनी सकळहि जावें ॥१॥
गृह सुत वैभव जाया ॥ हे सकळिक कृत्रिम माया ॥
व्याकुळ पडतां काया ॥ समूळ हा भ्रम वायां ॥२॥
नलगत पळ तनु जाय ॥ मग तूं करिसी काय ॥
भज भज श्रीगुरुपाय ॥ तेणें चुकतिल सर्व अपाय ॥३॥
अकळ तयाची करणी ॥ चित्सुख विल से करणी ॥
तमनाशक चिन्मय तरणी ॥ सायुज्य येउनि पर्णी ॥४॥
निजानंद जरि व्हावा ॥ तरि समूळ देहभ्रम जावा ॥
विश्वीं रंग पाहावा ॥ तरि स्वयेंचि सुखविसावा ॥५॥

पद ३८०.
मना हरी हरी बोल ॥धृ०॥
आयुष्य सांगतीं जातें हातोहातीं ॥ नये वेचितां कांहीं मोल ॥१॥
दिवि भुवि पाताळ समूळ द्दश्य जाळ ॥ हरीविण केवळ फोल ॥२॥
सांडुनि देह डोल विचारिं पहा सखोल ॥ निजानंदरंग-संगें डोल ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP