पदसंग्रह - पदे ३५६ ते ३६०
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ३५६. (बोलणें फोल झालें डोलणें वायां गेलें या चा.)
विचित्र झालें बोल बोलतां नये बोलें ॥धृ०॥
लोह कार्याचा पसारा ॥ वरी परीसाचा पडिला चिरा ॥
आलें दिव्य तेजाकारा ॥ परंपरा टाकुनि ॥१॥
तैसा तापत्रयीं संतप्त ॥ त्यावरि श्रीगुरुदया प्राप्त ॥
ठेवा सांपडला हो गुप्त ॥ झाळा तृप्त स्वानंदें ॥२॥
स्वरूपाची प्राप्ती झाली ॥ ममता गेली समता आली ॥
षड्वर्गांची बोहरी केली ॥ आशा तृष्णा सहीत ॥३॥
आत्माराम झाला काम ॥ सिद्ध स्वरूपीं विश्राम ॥
सरला लोभाचा संभ्रम ॥ मोह भ्रम नाढळे ॥४॥
दया वाढली अपार ॥ निंदा द्वेषा झाला मार ॥
विवेक विराग्य विचार ॥ हे साचार बळावले ॥५॥
सदां संतोषाशीं खेळ ॥ नवविधांशीं गदारोळ ॥
निरावंकाश सुख कल्लोळ ॥ काळ वेळ नाठवे ॥६॥
चित्त चैतन्यीं मुरालें ॥ मन कल्पनातीत झालें ॥
बुद्धिसि सम साम्राज्य आलें ॥ तें सुख बोलें न बोलवे ॥७॥
भेद झाला पाठिमोरा ॥ गुणदोषांचा नलगे वारा ॥
विश्वीं देखें विश्वभरा ॥ नाहीं थारा भ्रांतीसी ॥८॥
भोग मोक्षीं वीतरागी ॥ शांति वाणली सर्वांगीं ॥
निजानंदें रंग संगीं ॥ सच्चिद्भुवनीं विराजतो ॥९॥
उरला प्रारब्धाचा जल्प ॥ तोही वावुगा संकल्प ॥
निजानंदीं रंग अल्प ॥ नाहीं तरंगजळ-न्यायें ॥१०॥
पद ३५७.
श्रीगुरुरायें सांगों मी काय चोज केलें ॥धृ०॥
मन उन्मन जन विजन जनार्दन ॥ वावुगें जगद्भाव नेले ॥१॥
दावुनि विचित्र माव सारिले लौकिक भाव ॥ मीं माझें समूळ वाव झालें ॥२॥
देहीं विदेहीं निजानंद रंगला पाहीं ॥ सुख तें बोलतां नये बोलें ॥३॥
पद ३५८. (राग बिलावल)
रामीं रंगले दोलती मुनी ॥ सजनीं विजनीं वो ॥धृ०॥
ममता पसाराऽसारा, लक्षिति चिद्रुप सारा ॥ जिवनीं शोभती गारा, तद्वत् निर्धारा ॥१॥
क्रियमाणा संचितातें, बिंदलें घातलें होतें ॥ प्रारब्ध भोगी देहातें, न पवति मोहातें ॥२॥
सारुनि ध्येय ध्याता ध्यान, स्वरुपीं समाधन ॥ सहज चैतन्य-घन, वनवृत्ति विहीन ॥३॥
भोगितां उन्मनी ज्यांसी, न स्मरे दिवस निशी ॥ स्वानंदसोहळा सत्ता चिन्मय विलासीं ॥४॥
निजानंदें जे नि:संग, रंगले भंगळा रंग ॥ निर्विचार दशास्पद, नित्य अभंग ॥५॥
पद ३५९.
कर्म किंकरुं योगीयां नाहीं ॥धृ०॥
देव ऋषि पितरांचें ऋण त्यां नाहीं वो साचें ॥ निजानंदीं मग्न झालें चित्त जयांचें ॥१॥
देही पूर्ण संस्कारें जेविं वातें तरुवर ॥ राहियला अधिष्ठानीं न चळे स्थीर ॥२॥
आपपर नाहीं दोन्ही सम मानीं अपमानीं ॥ निजानंदें विराजतो अनुपम विज्ञानी ॥३॥
पद ३६०.
माझें मानस मोहिलें येणें माधवें वो ॥धृ०॥
साजिरें सुंदर ठाण मंजुळ वाजवी वेणू ॥ आवडी घेतली जाण या जिवें वो ॥१॥
रुळति वनमाळा गळां सवें गोपाळांचा पाळा ॥ लाविलें गोकुळ चाळा लाघवें वो ॥२॥
आकळे नकळे लीळा निजरूपें सोहळा ॥ रंगलें ययाच्या कळा वैभवें वो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP