मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे १०६ ते ११०

पदसंग्रह - पदे १०६ ते ११०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद १०६. कामदाछंदावर.
प्रथम मस्तकीं मोरया धरूं ॥ मग समस्तही देवता वरुं ॥
विधिसुता तथा साधु सज्जना ॥ नमुनि आदरूं प्रार्थना मना ॥१॥
अजित निर्जरा पन्नगा नरा ॥ वर निशाचरा यक्ष किन्नरा ॥
हरि वदे मुखें इंद्रियांत मी ॥ तव पराक्रमा कोण आक्रमी ॥२॥
सदय पाहासी प्राणियांकडे ॥ मग तयां पडे कोण सांकडें ॥
न घडतें घडे काळ आतुडे ॥ अमृतसागरीं सर्वदां क्रिडे ॥३॥
भवतरू कलीमाजि उन्मळी ॥ तुजविना बळी कोण भूतळीं ॥
तरि मतें करी साह्यता बरी ॥ परम मित्र तूं ये अवसरीं ॥४॥
विविध अंबरीं अंडजें खगें ॥ जळचरें जळीं काननीं मृगें ॥
उरग कीटकी गर्भयातना ॥ मरण जन्म हीं सोसवोति ना ॥५॥
परिसतांचि ते ग्लानि राघवें ॥ मन विबोधुनी पूर्ण लाघवें ॥
करि दया लिलारूपविग्रही ॥ उपनिषेदिंचें सार संग्रहीं ॥६॥
निकट संकटीं द्रौपदी गजा ॥ उपजली कृपा त्या अधोक्षजा ॥
मज दया करी यापरि हरि ॥ त्वरित रक्षिलें दु:खसागरीं ॥७॥
हरि गुरू दयासागराप्रती ॥ वरद इच्छिला हाचि निश्वितीं ॥
तव पदांबुजीं पूर्ण दे रती ॥ विसर तो पडे देहसंस्मृती ॥८॥
विगत शोक हो मोह मावळो ॥ कृपण कल्पना इषणा टळो ॥
पदपदर्थिंचा स्नेहही जळो ॥ सच्चिदान्वयी देहही गळो ॥९॥
भजन भाग्यही अंतरीं वसो ॥ स्व पर सारखे सर्वदा दिसो ॥
निशि दिवा चिदानंंदसागरीं ॥ अणुपरी दुजी न स्मरों परी ॥१०॥
सहज सत्क्रिया मीपणें विना ॥ फळरहीत निर्हेतु भावना ॥
सुकृत पातकें पूर्वसंचितें ॥ विफळती जशीं स्वप्निंचीं कृतें ॥११॥
लव निमिष्यही देहभावना ॥ नुपजवी कदां अल्पही मना ॥
इहपरत्रिंची भाग्य संपदा ॥ मृगजळा परी मानवी सदा ॥१२॥
रिपुसमूह तैं काय तो करी ॥ विसरतां पडे अष्टही पुरीं ॥
विदुष बोलती लिंगभंग तो ॥ निज अभंग तो रंग रंगतो ॥१३॥

पद १०७.
श्रीगुरुराजदयेनें अद्भुत केलें वो ॥धृ०॥
दोहीं नेत्रीं एकचि आपण ऐसें झालें वो ॥१॥
देखते ऐकते एकचि होउनि प्रत्यया आले वो ॥२॥
भवभ्रम भंगे निजसुख रंगे बोलणें ठेलें वो ॥३॥

पद १०८.
करुणा आली रे आली रे ॥ दयाळ गुरु माउलि रे ॥धृ०॥
नमितां सद्नुरुचरणा ॥ भवभयहरणा जगद्नुद्धरणा ॥१॥
श्रवणीं प्रबोधुनी महा वाक्य ॥ स्वरुपीं जीव शिव केलें ऐक्य ॥२॥
निजानंदें पूर्ण रंग ॥ रंगीं रंगविला अभंग ॥३॥

पद १०९.
लाहो घ्या हरिभजनाचा ॥ संग करुनियां सुजनाचा ॥धृ०॥
दुर्लभतर मानवि काया ॥ कां लावावि विषय विकाया ॥१॥
बुद्धयादिक सर्वहि करणें ॥ हरिभक्तिपरायण करणें ॥२॥
मन उन्मन करुनी स्मरणीं ॥ हरीकीर्तन ऐका श्रवणीं ॥३॥
दवडुनियां आळस निद्रा ॥ लागोंद्या चिन्मयामुद्रा ॥४॥
निजानंदें रंगुनि पूर्ण ॥ करा हरिनारायण स्मरण ॥५॥

पद ११०.
एकनिष्ठ सद्भाविक विश्वासु तो गडी आमुचा ॥
याच्या दासी आह्नी होऊं काया मनें वाचा ॥धृ०॥
अभाविक निंदक जो त्याचें मुखहि न अवलोकूं ॥
सज्जनचरणीं न लवे सहसा त्याची गडी फूंकूं ॥१॥
हरिगुरुभजनीं विमुख जो त्याच्या देशीम न राहूं ॥
दोषी दुर्जन त्याचें स्वप्नीं मुखहि न पाहूं ॥२॥
सर्वस्वेंसी शरणागत जो साधूसंतांसीं ॥
निज रंगें रंगुनियां त्याच्या घरिंच्या होउं दासी ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP