पदसंग्रह - पदे २१ ते २५
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद २१.
फट फट तूं चुकलासी लंडी ॥धृ०॥
टाकुनिं श्रीहरी विषयीं सुखावसि लाविल यम दोर दंडीं ॥१॥
पावन मानिसी जन धन संगें पडिलासी व्यामोह कुंडीं ॥२॥
आतां तरी शरण तूं जाईं निजरंगा ॥ लक्ष चौर्याशीं फेरे खंडीं ॥३॥
पद २२.
जिव्हें स्मर गे हरि हर गे ॥धु०॥
सार या लोकीं आणिक नाहीं ॥ मृगजळ क्षण भंगुर गे ॥१॥
संत सनक दिक तरले या नामें ॥ हेंचि ब्रह्म परात्पर गे ॥२॥
हरले दोष निजानंदरंगें ॥ स्मरतां वाचे श्रीशंकर गे ॥३॥
पद २३
अभंग.
माझे कुळिंचा स्वतंत्र ॥ राम निजमूर्ति षडाक्षरी मंत्र ॥धृ०॥
सर्व साधनाचें सार ॥ रामनिजमूर्ति हा उच्चार ॥१॥
योग याग तपें तपती ॥ आह्मां येणेंचि कैवल्य प्राप्ती ॥२॥
वंशीं न करी जो जतन ॥ त्यासि घडलें जाणा पतन ॥३॥
धरितां स्मरणाचा छंड ॥ रंगीं रंगला निजानंद ॥४॥
पद २४.
हें तों खोटें र हें तों खोटें ॥धृ०॥
स्वकीर्ति ऐकतां श्वघ्यंता वाटते ॥ परदोष दिसती नेटे ॥१॥
बोलण्यामाजीं कांहीं चलणें घडेना ॥ विटंबिलीं सर्व पोटें ॥२॥
स्वहित मानिलें नांदतां ह्रंदयीं ॥ काम क्रोध लोभ पोटीं झटे ॥३॥
संकल्प विकल्प करितां राहिना ॥ बुडविलें मन मर्कटें ॥४॥
निंजानंद रंग नि:संग ॥ त्या शरण मी जाउनियां न भेते ॥५॥
पद २५.
पिटोनि डांगोरा बोले वेद वाणी ॥ हित नेणें कोण्ही बहिर्मुख प्राणी ॥१॥
व्यापिलें षड्वर्गीं लोभ मोह अंगीं ॥ दावावया जगीं वर्तती कुयोगी ॥२॥
चंदनाचीं काष्ठें रासभाचे पृष्ठीं ॥ व्यर्थ तैसा कष्टी विश्व पाहे द्दष्टीं ॥३॥
त्यागावे दुर्गुण संमत वेदांचें ॥ आणि साधुवृंदाचें अंतरसाक्ष साचें ॥४॥
संतसंगें रंगे सच्छास्त्र प्रसंगें ॥ गुरुकृपा अंगें पावे तो निजांगें ॥५॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP