मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ५४६ ते ५५०

पदसंग्रह - पदे ५४६ ते ५५०

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ५४६.
कांरे हरी आठविला नाहीं ॥ध्रु०॥
देखत अंध बधिर कानीं ऐकुनि मूढ मनीं ॥ उपरतीचा लेश नसे कांहीं ॥१॥
विषयसुखालागीं कैसें चित्त भोंवे पिसें जैसें ॥ धरुनियां तादात्म्य देहीं ॥२॥
पूर्ण निजानंदें रंग धरीं सांडीं नाना छंद ॥ पडों नको मायाप्रवाहीं ॥३॥

पद ५४७.
करुनियां काय वण वण वण वण ॥ध्रु०॥
गोड दिसे बहिर्रंग जनाप्रति ॥ अंतरिं उध्वस भण भण भण भण ॥१॥
तीर्थं तपें बहु केलीं परि ते ॥ जागति षड्‌रिपु दण दण दण दण ॥२॥
निजरंगें मन शांत नव्हे ॥ करि कामज्वरें तनु फण फण फण फण ॥३॥

पद ५४८. [आ. स्वा. कृ.]
वद वद वद गे जिव्हे श्री रंग रंग रंग ॥ध्रु०॥
मानुनि गोड रसा विषयांच्या होऊं नको तूं दंग दंग दंग ॥१॥
परनिंदा परदोष नरस्तुति, सांडुनि यांचा संग संग संग ॥२॥
पूर्णरंग हरी न भजसि जरी तरी करिल तुझें यम भंग भंग भग ॥३॥

पद ५४९.
आतां तरी जागे गुरुपदिं लागें ॥ध्रु०॥
लक्षचौर्‍याशीं सोंगे घेतलीं मागें ॥ नरदेह आहे हिताजोगं ॥१॥
सज्जनसंगें सच्छास्त्रमार्गें ॥ अनुदिन निजहितीं वागें ॥२॥
विवेक वैराग्यें गुरुकृपें योगं ॥ सहज पूर्ण निजानंदीं रंगें ॥३॥

पद ५५०.
बाई गे ऐशीं चिन्हें कैं येतिल माझे ठायीं ॥ध्रु०॥
देहीं न धरुनि ममता त्यजुनि गृह कांचन कांता ॥ आंगीं बाणेल कैं निस्पृहता ॥१॥
अनित्याचा त्याग द्दष्टी नित्य स्वरुपेशीं भेटी ॥ भगवद्भजनीं आवडि मोठी ॥२॥
निर्मय होऊनि नांदें विचरें मीं निजछंदें ॥ रंगीं रंगोनि निजानंदें ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP