मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६६१ ते ६६५

पदसंग्रह - पदे ६६१ ते ६६५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६६१. [यादवरावअप्पाचे चि. आनंदरावकृत.]
वृंदावना आला तो रंगनाथ ॥ त्यासि पाहतां पुरले मनोरथ ॥ध्रु०॥
निजानंदसदना कृष्ण आला हो ॥ यशोदेसी आनंद झाला हो ॥
बाळपणी पूतनावध केला हो ॥ आत्माराम गोकुळा प्रकट झाला हो ॥१॥
ज्याच्या रूपा प्रतिमा सांपडेना हो ॥ ज्याचे गुण शेषासि वर्णवेना हो ॥
दाता ऐसा स्वराज्य दिधलें दान हो ॥ ज्याचें नाम विख्यात त्रिभुवनीं हो ॥२॥
ज्याची करणी न कळे पूर्ण देवा हो ॥ पांडवांसि रक्षिलें करितां धांवा हो ॥
योगी ध्यानीं करिती ज्याची सेवा हो ॥ त्याचें ध्यान लागलें सदाशिवा हो ॥३॥
संतांमाजीं श्रीद्वारकेचा राजा हो ॥ ब्रह्मादिक इच्छिती चरणरजा हो ॥
संकट पडतां पावतो भक्तकाजा हो ॥ दीनवत्सल कृपाळू महाराजा हो ॥४॥
निर्गुण पुर द्वारका सुखपट्टणीं हो ॥ कृष्णातीरीं राहिले चक्रपाणी हो ॥
शरणागत दयाळू मोक्षदानी हो ॥ श्रीरंगाच्या आनंद लोळे चरणीं हो ॥५॥

पद ६६२.
श्रीगुरुचरणस्मरणीं अंत:करणीं सुख झालें ॥ परा पारुषली तें मज नें बोलवे बोलें ॥ध्रु०॥
मुके साखर सेउनि गोडी सांगों जातां वाचे ॥ नि:शब्द शब्दें गर्जे कांहीं हांसे कांहीं नाचे ॥१॥
अंतरिंचें सुख अंतर्मुख ते जाणति चिन्हांवरुनी ॥ तर्क वाटे तार्किक बोलती परोक्षज्ञानें ज्ञानी ॥२॥
जेणें श्वानें तस्कर देखिला तें भुंके ॥ ऐकोनि अवघीं तैशींच भुंकती त्या कोणिही नोळखे ॥३॥
जाणिव नेणिव सरली केवळ जाणणें मात्रचि उरलें ॥ उरलें पुरलें हेंही जेथें म्हणते म्हणणें सरलें ॥४॥
तन्न तन्न हा शब्द निमाला सहज पूर्ण निजरंगीं ॥ कल्पांतीं जळ नभमय झालें प्रमाणरहित तरंगीं ॥५॥

पद ६६३. [डफगाणें.]
अपार पूर्वपुण्येंकरुनी प्राप्त झाली मानवयोनी ॥ त्याहिमध्यें ब्राह्मण ज्ञानी पुरुषोत्तम तो ॥१॥
तरीच जन्माचें सार्थक म्हणोनि ध्यावें पुण्यश्लोक ॥ व्हावें तरोनियां तारक त्या दीक्षाग्रहणें ॥२॥
शतपथ मर्यादा संरक्षी कर्म ब्रह्मरूपें लक्षी ॥ वर्णाश्रम विधि पाळुनि साक्षी ॥ विदेहत्वेंसी ॥३॥
निष्कामता निरहंकृती ब्रह्मार्पण तें सहजस्थितो ॥ स्वस्वरूपीं मनोवृत्ति कुंठित जाहल्या ॥४॥
दैवी संपत्तिचीं लक्षणें सेवे तिष्ठति सेवकपणें ॥ वाचा रंगली हरिस्मरणें सर्वही काळ ॥५॥
भगवद्भक्त विरक्त ज्ञानी साधनयुक्त नवविध भजनीं ॥ अष्टहि भावें जो दिनरजनीं तन्मय झाला ॥६॥
संचित प्रारब्ध क्रियमाण जिणें मृगजळवत्‌ हे जाण ॥ केलीं शाहिर तो डफगाण या त्रिभुवनीं ॥७॥
भेदवादी वादक जिंकी ऐसा विरळा कैंचा लोकीं ॥ बिरुदें सोडवुनि अवलोकी जो समभावें ॥८॥
जैसी दुग्धपटाची घडी न ये उकलितां तांतडी ॥ डफगाण तेओ आमुचा गडी जीव जीवाचा ॥९॥
सर्वहि संगीं जो नि:संगीं तो नर नारायण कलयुगीं ॥ निजानदें पूर्ण रंगीं रंगोनि ठेला ॥१०॥

पद ६६४. [वासुदेव]
तो मी रामकृष्ण व सुदेव ॥ जो जिवाचाहि निज जिव ॥
जयाचेनि भासे जग सर्व ॥ जो सावयव ना निरवयव ॥ध्रु०॥
ज्याचें श्रवण जाणें कोण किती ॥ ज्याच्या डोळ्यांसि नाहीं मिती ॥
चरण कर शीर अपार मिती ॥ अंत नाहीं अनंत मूर्ति गा ॥१॥
जेथें वेदश्रुति परतल्या ॥ चारी वाचा जेथें खुंटल्या ॥
सकळ क्रिया जेथें उडाल्या ॥ चारि मुक्ति जेथें बुडाल्या ॥२॥
जें साकार ना निराकार ॥ जें जवळी नव्हे जें दूर ॥
जें अंतरीं ना बाहेर ॥ ज्याचा एकहि नव्हे निर्धार ॥३॥
जें आहे म्हणतां घेतां न ये ॥ नाहीं म्हणुनि टाकिला नव जाय ॥
आहे नाहीं म्हणणें न साहे ॥ सकळ चातुर्य जेथें राहे गा ॥४॥
जेथें नाहीं भेदाभेद ॥ जेथें नाहीं मुक्त ना बद्ध ॥
जेथें आनंद ना दु:खबाध ॥ रंगातीत अद्वय निजानंद गा ॥५॥

पद ६६५. [वासुदेव.]
गोविंदा रामा हो गोपाळा रामा जी ॥ध्रु०॥
श्रीहरि वासुदेवें नरवेश साधिला जी ॥ नि:संग अंग रंगें निजरंग माजला जी ॥
हरि राम कृष्ण शब्दें करटाळि वाजवा जी ॥१॥
शिखिपिच्छ मुकुटातें शिरीं भाव दाविला जी ॥ निज निढळीं केशराचा अजि तिलक लाविला जी ॥
तुळसीमंजरीचा माथां तुरा खोंविला जी ॥ श्रवणिं कुंडलें हो मणिभार शोभला जी ॥२॥
अजि बाहु भूषणेंसि अजि दिव्य शोभती मा ॥ मुरलि वाजवितो अजि मधुर गोपती मा ॥
जन्म हे मृत्यु तेव्हां थरथरां कांपति मा ॥३॥
तव नाम नारदाले हें दान पावलें जी ॥ मुनि त्वरित वाल्मिकाले हें दान पावलें जी ॥
सोरटी सोमनाथा हें दान पावलें जी ॥४॥
परळि वैजनाथा अजि दान पावलें जी ॥ माय देवी मंगलेबा हें दान पावलें जी ॥
पंढरी विठ्ठलाले हें दान पावलें जी ॥ गोविंदा० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP