पदसंग्रह - पदे ४९६ ते ५००
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ४९६.
तुज उजडेना कां प्राण्या ॥ध्रु०॥
कोण मी कैसा ऐसा कांहीं समज पडेना कां ॥१॥
आत्मानात्मविचार विवेकीं चित्त जडेना कां ॥२॥
गुरुकृपें निजरंगें रंगुनि ऐक्य घडेना कां ॥३॥
पद ४९७.
मूर्ख बहीर्मुख रे झाले ॥ध्रु०॥
अंतर कटुतर वरि वरि सुंदर शोभें आलें रे ॥१॥
इंद्रिवारुणी सेवूं जातां वायां गेलें रे ॥२॥
अंतर्बाह्म निजरंगें रंगुनि स्वहित न केलें रे ॥३॥
पद ४९८.
योगी स्वानंदें उन्मत्त रे ॥ध्रु०॥
रामरसें मन होउनि उन्मन ॥ अखंड डुल्लत रे ॥१॥
देहबुद्धि वरिना ही ॥ साधू ब्रह्म सदोदित रे ॥२॥
निजरंगें रगुनियां पूर्ण ॥ देहीं देहातीत रे ॥३॥
पद ४९९.
आजि मोठा हो लाभ लाभ लाभला ॥ध्रु०॥
हरिगुरुचरणीं मन जाहलें उन्मन मानवी जन्म हा शोभला ॥१॥
दैवी समूह विवेक विचारें दुश्वरणावरी क्षोभला ॥२॥
द्वैतभावना न दिसे जिजरंगीं ॥ हा दुर्जन कीं हा भला ॥३॥
पद ५००.
सदां श्रीहरिचें नाम मुखीं गात जा हो ॥ सप्रेमें करुनि टाळि वाहात जा हो ॥ध्रु०॥
वर्णाश्रमविहित कर्म करणें हा परम धर्म ॥ निरहंकृति कंजनयन ध्यात जा हो ॥१॥
सत्संगें शास्त्रश्रवण श्रवणाचें करुनि मननन ॥ निजध्यांस पूर्णसुखी राहत जा हो ॥२॥
निरतिशय निजानंद हाचि अहर्निशीं छंद ॥ अंतरंग तोचि जगीं पाहात जा हो ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP