मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ४११ ते ४१५

पदसंग्रह - पदे ४११ ते ४१५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ४११. [चाल-न्हाणि न्हाणि त्या निर्मळातें]
देईं इतुलें अंतरिंचें गुज सांगितलें ॥ निगमागमिंचें ह्रद्नत तें तुज मागितलें ॥धृ०॥
कृपावंता विज्ञप्ति परिस अनंता ॥ छेदि अहंता दुर्निवार ममता चिंता ॥
निरवीं संता भगवंता कमलाकांता ॥ भुवनत्रयींचें साम्राज्य न मागें आतां ॥१॥
संकट भारी मानुनियां नेदिसि चारी ॥ तरिएकच देईं विद्वज्जनंसंग मुरारी ॥
दीनवत्सल ते तूं भक्तकाजकैवारी ॥ त्यचेनि विजयी मी षड्वर्गाच्या समरीं ॥२॥
जगदुद्धारीं तव भक्त सुपावन कारी ॥ होसी मत्स्य कूर्म वामन तूं त्यांचे द्वारीं ॥धृ०॥
चित्ता जयाचें निर्मत्सर निर्भय साचें ॥ सदय सदांचे विगताशय अंतर ज्यांचें ॥
पियूष वाचें बोलति त्या सदन शिवाचें ॥ निजरंगें त्या बहिरंतर चित्सुख नाचे ॥३॥
हो जे झालें मी दास तयांचा बोलें ॥ न धरीं पदरीं तुजं अंतरसाक्षी केलें ॥धृ०॥

पद ४१२. [चाल-सदर]
पाहा पाहा श्रीराम नयनीं पाहा ॥ न दिसे ऐसा शोधितां दिशा दाहा ॥
निज ह्रत्कोशीं अनुभवोनि तन्मय राहा ॥ नेणति चारी अष्टादश आणि साहा ॥धृ०॥
सूर्य़वंशीं अज अव्यय जो निष्काम ॥ दशरथ कौसल्योद्भव मुनिमनविश्राम ॥
लीलाविग्रही अवाप्त पूर्णकाम ॥ वशिष्ठ बोले सच्चिदानंद नाम ॥१॥
विधि मुळ आपुलें शोधितां सहस्र वर्षें ॥ मग गजबजिला पातला वरि उत्कर्षें ॥
म्हणे मग पावें तंव वर दिधला हर्षें ॥ तप तप शब्दें तो पावन केला स्पर्षे ॥२॥
मायायोगें जो विवर्तरूपें भासे ॥ तटस्थ स्वरुपें लक्षणें द्वय लक्षांशें ॥
विद्वत्ज्ञानी अनुभविती स्वात्मतोषें ॥ एवंविध तो गुरु शास्त्र आत्मविलासें ॥३॥
अलंकारीं सुवर्ण शोभा दावी ॥ तेवि निजात्मा अवतरला मनुष्यभावीं ॥
महिमा ज्याची कवणासि नाहीं ठावी ॥ शिव ह्रत्कोशीं निजस्वरूप ज्याचें भावी ॥४॥
गमलें विबुधां भवबंदी मोचन झालें ॥ दिनकर भावी वंशासि दैव आलें ॥
वसुधा हर्षे. हो मस्तकिंचें जड गेलें ॥ या निजरंगें त्रैलोक्य सुखी केलें ॥५॥

पद ४१३. [चाल-सदर.]
तंव आकाशीं गर्जति भेरी काहाळा ॥ वर्षती सुमनें सुर जयजयकार झाला ॥धृ०॥
प्रसूतकाळीं कौसल्या एकांतीं ॥ सम्मुख देखे तव दिव्य चतुर्भुज मूर्ति ॥
मंडित आयुधें बालार्कसाद्दश्य दीप्ति ॥ बोले तनयो मी आलों तुझिये भक्ति ॥१॥
हर्षें खेळे अंकावरि बाळकवेषें ॥ वशिष्टा पाहें अंतरिच्या ज्ञानप्रकाशें ॥
जगदुद्धारा हा अवतरला संतोषें ॥ चित्तिं स्मरला वाल्मीकिभाष्य विशेषें ॥२॥
त्रिभुवन विजयी हा होईल बाळक प्रभुचा ॥ चाळक जगतीतळ पाळक ऋषिमंडळिचा ॥धृ०॥
तारिल अहल्या ताटिका मारिल बाणें ॥ कौशिकयज्ञातें रक्षिल क्षात्रत्राणें ॥
त्र्यंबकभंगें सत्कीर्ति होईल तेणें ॥ वरील सीता संतोष जीवप्राणें ॥३॥
पितृवचनातें पाळुनियां जो वनवासी ॥ वानरसेना करुनी जो मित्रत्वेंशीं ॥
शिळा सेतू संपादिल साहाय्यासी ॥ उतरिल कपिसेना चर्या अद्भुत ऐसी ॥४॥
दशमुख वधुनी बिभिषणासि लंका ओपी ॥ आणुनि सीता स्वस्थानीं सुरवर स्थापी ॥
रामराज्यीं निर्द्वंद्व न दिसे पापी ॥ निजसुखरंगें श्रीराम पूर्ण प्रतापी ॥५॥

पद ४१४.
नंद यशोदेचा बाळक तो श्रीहरि वो ॥ पांवा मंजुळ वाजवी तो मो हरि वो ॥
गोपी-गोपाळांचीं मानसें मोहरी वो ॥ तोय तुंबलें कालिंदीच्या उदरीं वो ॥धृ०॥
देहभाव झाला वाव सरली लाज वो ॥ वृत्ति वेधली भुलली गृहकाजा वो ॥
प्राणाचाहि प्राण भाविती यदुराज वो ॥ झालें नाहीं कालत्रयीं ऐसें चोज वो ॥१॥
प्रेमभावें जाती जेथें तो श्रीपति वो ॥ वस्त्रें भूषणें पालटूनि लेती वो ॥
पयपानातें बाळकें न करिती वो ॥ वेणु-गानश्रवणें विचित्न झाली स्थिति वो ॥२॥
व्याळ नकुळेंशीं स्वच्छंदें खेळताहे वो ॥ धेनु व्याघ्रेंशि केसरी गजीं राहे वो ॥
शुकसारिकासमाजीं श्येनु पाहीं वो ॥ कैंचा वैरभाव कृष्णीं तन्मयता वो ॥३॥
इंदु मंदला तो वेग वायो टाकी वो ॥ शेष डोले कूर्म आंगीं पाय ओढी वो ॥
भानु थोकला आश्वर्य त्नैलोकीं वो ॥ गोवळ नाचे छंदें गर्जे तोडर वांकी वो ॥४॥
बोले शेषहि नेणव याचा पार वो ॥ लीलाविग्रही घेतला अवतार वो ॥
जाणती साधु सज्जन नेणती भूमीभार वो ॥ निजानंद रंगला श्रुतीसार वो ॥५॥

पद ४१५. [चाल-बोलणें फोल झालें डोलणें०]
देहीं मी माझे वैरी यांतें शीघ्र मारीं ॥धृ०॥
दुर्जय संपदा आसुरी शोक मोह दंती भारी ॥ राग द्वेष सुह्रद यांचे साहाकारी ॥१॥
इच्छा माता चिंता कांता लोभ पाठीराखा भ्राता ॥ आशा तृष्णा विलासिनी या कुमारी ॥२॥
लक्ष कोटि जन्मवरी न सुटती दुष्ट वैरी ॥ दानवां मानवां खेदकारी ॥३॥
उपाय हा एक यातें साधुसंगें शास्त्रमतें ॥ जाणिजे मी कोण येथें देहधारी ॥४॥
जरी गुरुकृपा होय तरि हे सांपडे सोय ॥ जीव हा रंगुनि जाय ईश्वरीं ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP