मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्रीरंगनाथस्वामीकृत पदसंग्रह|
पदे ६११ ते ६१५

पदसंग्रह - पदे ६११ ते ६१५

रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.


पद ६११.
मला काय उणें वो ॥ कोठें न माय मी माझ्या पूर्णपणें वो ॥ध्रु०॥
जिकडे तिकडे वो मूर्तिमत रोकडें हो ॥ ठाव नाहीं रिता कोठें मागें पुढें वो ॥१॥
जळीं स्थळीं वो मीचि भूमडळीं वो ॥ एक सत्ता आली हातां निजमूळीं वो ॥२॥
क्षयाक्षयातीत वो सत्य सदोदीत वो ॥ स्वसवेद्य ठेवा माझा अपरमित वो ॥३॥
सर्वरहीत वो सर्वसहित वो ॥ अन्वयव्यतिरेकेविण वेदविहित वो ॥४॥
निजानंदकंद वो नित्य निर्द्वंद्व वो ॥ सर्व रंगीं रंगुनियां स्वच्छदें वो ॥५॥

पद ६१२. [काशीराजकृत.]
ऐसें कैसें हें बाळा ॥ असोंदे यशोदे तुझें बोलणें मायाजाळ ॥ध्रु०॥
कडे घेतां ह्रदयीं जडतो ह्रदयाच्या ग्रंथी सोडीतो ॥ धरुनी हातीं माझे कुच कंदुक म्हणतो टवाळ ॥१॥
येउनि निजभुवनास केला गोरसाचा नाश ॥ धरूं जातां ब्रह्मादिकां सांपडेना चक्रचाळ ॥२॥
अबळा बाळा सुंदरी भोगुनी बाळब्रह्मचारी ॥ बोलों जातां बैखरी लज्जाही न धरी कुटाळ ॥३॥
आतां आम्ही परनारी संसारी लोकाचारी ॥ बोलों जातां घरोघरीं म्हणती झाल्या तोंडाळ ॥४॥
श्रीरंगानुज-आत्मजानें मनिंचे मनीं राहावें मौनें ॥ सहज पूर्ण निजानदें रंगुनियां सर्वकाळ ॥५॥

पद ६१३. [काशीराजकृत.]
माझा बाळ त्यावरि आला लटिका आळ वो ॥ दिनकर किरणावरी भासतें जैसें मृगजळ वो ॥ध्रु०॥
अगई कृष्णाचे अंगीं कर्में लाविती ॥ कांहीं नसतां जैसी निळीमा नभीं भाविती ॥१॥
उंडी घालिति स्वानदें गोपी पातल्या ॥ जन हे त्रिगुणात्मक बोलते कृष्णीं रातल्या ॥२॥
नाहीं भोगणें त्यागणें धर्माधर्म वो ॥ नाना प्रकारें बोलती त्याचें वर्म वो ॥३॥
जैसी भावना तैसीं फळें पावती वो ॥ लोहचुंबक-न्यायें चित्सत्तेवरी धांवती चो ॥४॥
लीलाचरित्र जगदुद्धारास्तव हें केलें वो ॥ श्रीरंगानुजतनुजा सकळही विदित झाले वो ॥५॥

पद ६१४. [चाल-सदर.]
ये आई राधा मजवरी बालंट घेते पाहा गे ॥ध्रु०॥
जाणणें नेणणें कांहीं दोन्हीं माझे ठायीं नाहीं ॥ मी अलांछन निष्कळंक पाहीं गे ॥१॥
अवस्थातीत मी बाळ पूर्णदशा सर्वकाळ ॥ आला तुजवरी ह्मणती आळ गे ॥२॥
भोक्ता होउनि भोग भोगीं ॥ त्यागी होउनि विषय त्यागी ॥ दोन्हीं नाहीं माझ्या अंगीं गे ॥३॥
ज्या ज्या जैशा भावें भजती त्यां त्यां तैसी फळप्राप्ती ॥ सर्वांतरसाक्षी मी निजमूर्ति गे ॥४॥
रज्जुवरि सर्पाचें भान म्हणती विवर्त उपादान ॥ परि तो झाला नाहीं आन गे ॥५॥
सहज पूर्ण निजरंग अद्वय अक्रिय अभंग ॥ नसतें मजवरी घेती आंग गे ॥६॥
असतांही वर्णाश्रमधर्मीं नातळे या गुणग्रामीं ॥ श्रीरंगानुजात्मज स्वामी गे ॥७॥

पद ६१५. [चा. सदर]
वेडें कां झालें मन पाहेचि परतोन ॥ स्वस्वरुपीं अनुनि ह्मणुनी सांगणें यासी ॥ध्रु०॥
धरुनी देहाभिमान करितें विषयांचें ध्यान ॥ क्लेशी होतें म्हणउनि सांगणें यासी ॥१॥
दु:खरूप मृषामय देहादी भुवनत्नय ॥ हा दुर्विषय म्हणुनी सांगणें यासी ॥२॥
यासि हाचि तरणोपाय धरावे श्रीगुरुपाय ॥ निजानंद होय म्हणुनी सांगणें यासी ॥३॥
पूर्णरंगें रंगुनी सावध व्हावें मनीं ॥ श्रीरंगानुजतनुजें म्हणुनी सांगणें यासी ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP