पदसंग्रह - पदे ९६ ते १००
रंगनाथ स्वामींचा जन्म शके १५३४ परिघाविसंवत्सर मार्गशीर्ष शुद्ध १० रोजीं झाला.
पद ९६.
आह्मी जन्म अनंताच्या ॥ दासी झालों संतांच्या ॥
संतपदीं निजानंदें विचरों मोक्ष श्रीमंताच्या ॥धृ०॥
अवाप्त कामगुणें ॥ उसंत नाहीं पूर्णपणें ॥
मुक्ताफळ चिद्रत्नें मिरवुं निजांगीं लेणें ॥१॥
सच्चित्सुखभुवनीं ॥ जीवन भरुं या जगजिवनीं ॥
द्दश्य भान मळ निरसुनि निर्मळ ॥ नित्य अधिष्ठानीं ॥२॥
नमितां संतपदा ॥ भय कवणाचें काय तदां ॥
अहं-रावण मारुं सेना सह त्रिविध छेद-भेदा ॥३॥
सम साम्यें सेवा ॥ अभेद भजनें गुरु देवा ॥
संतचरणरज वंदुं पूर्वजन्मांतर ठेवा ॥४॥
कामीं निष्काम ॥ रामीं विश्रामधाम ॥
संतकृपापांगें पूर्ण रंगें गितीं गाऊं गुरुनाम ॥५॥
पद ९७.
भीमातीरविहारी हा क्षिरसागरवासी ॥
ब्रह्म सनातन सच्चिद्धन मन मोहन अज अविनाशी ॥धृ०॥
ज्ञानहीनें अतिदीनें मुढें तामसविषयविलासी ॥
दर्शनमात्रें जड जिव तारिती भवसागर ह्रर्षिकेशी ॥१॥
भव-तमनाशक चिद्भानू निज तेजें विश्व प्रकाशी ॥
मुनिजनमानस जलरुह विकसित कर्ता या ह्रत्कोशीं ॥२॥
भक्तोमरतरु श्री विठ्ठल गुरुराज मंत्र उपदेशी ॥
विश्वपटीं चित्तंतु ह्मणे मीं पूर्ण रंग यदुवंशीं ॥३॥
पद ९८.
हो जें झालें तें झालें तें ॥ फळलें तप केलें तें ॥धृ०॥
हरिशीं सर्वस्वें रत झालें ॥ माणुसपणांतुनि मी गेलें ॥१॥
जन वन हरिमय सबाह्म देखें ॥ झालीं मृगजळवत सुखदु:खें ॥२॥
काय केलें होतें कर्म ॥ समुळीं बुडाले धर्माधर्म ॥३॥
नेणों काय होता भोग ॥ कैसा येउनि घडला योग ॥४॥
रंगीं रंगोनि निजानंदें ॥ विचरें चिद्भुवनीं स्वच्छदें ॥५॥
पद ९९.
तो मज मानेना तो मज मानेना ॥धृ०॥
चित्त सतत रत अविहित कर्मीं भजनीं विमुख सदाही ॥
परपीडक परदोषदर्शनीं तत्पर ब्राह्मणद्रोही ॥१॥
निर्दयह्रदय पदोपदीं संशय वचनीं निश्चय नाहीं ॥
स्वदोष लोपी अति संतापी पडिला विषयप्रवाहीं ॥२॥
सारासारविचार विहिन जो आत्मघातकी प्राणी ॥
निज रंगें रंगेना त्याचें मुख न विलोकिति कोण्ही ॥३॥
पद १००.
तो मज बहु माने तो मज बहु माने ॥धृ०॥
मनबुध्यादिक करणसमुच्चय हरिभजनीं रत झाला ॥
विहिताचरणें सद्नुरुस्मरणें प्रियतम होय अजाला ॥१॥
सर्व भूतिं भगवंत विलोकुनि भूतदयार्णव अंगें ॥
सबाह्यांतर चिद्रत्नाकर झाला विद्वत्संगें ॥२॥
अंबरमणि दिनरजनी नेणें स्वप्रकाश घनतेजें ॥
ज्ञानाज्ञानविहिन निज रंगें विचरें सहजीं सहजें ॥३॥
N/A
References : N/A
Last Updated : November 11, 2016
TOP